<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 13 – जळगाव, अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा आणि धरणगाव येथील व्यवहार बंदच्या काळात धान्य बाजारांचे व्यवहार सुरू ठेवण्यात यावे. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. धान्य बाजारांचे व्यवहार सुरू ठेवताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेल्या सूचना, आदेश, निर्देशांचे काटेकारपणे पालन केले जाईल. तसेच नागरिकांची कोणत्याही प्रकारे गर्दी होवू न देता Social Distancing (सामाजिक अंतर) पाळण्याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांची राहील. या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र राहील. असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील 14 मार्च 2020 रोजीच्या पत्रानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-1897 हा दिनांक 13 मार्च पासून लागू करण्यात करून खंड 2 ते 4 मधील तरतूच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोव्हिड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी जिल्ह्यातील जळगाव, अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव, पाचोरा आणि धरणगाव येथील कृषि उत्पन्न बाजार समित्यांमधील भाजीपाला मार्केटचे व्यवहार पुढील आदेशापर्यंत पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत.