<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 13 – नोडल अधिकारी या नात्याने उपविभागीय दंडाधिकारी, फैजपुर भाग, फैजपुर ता. यावल, जि. जळगाव डॉ. अजित थोरबोले असे आदेश देत आहे की, माझ्या कार्यक्षेत्रात असलेल्या रावेर व यावल तालुक्यातील सर्व नागरिकांना मास्कचा वापर अनिवार्य राहिल तसेच असे मास्क नामांकित प्रतीचे अथवा घरगुती पध्दतीने तयार केलेले व योग्य पध्दतीने स्वच्छ व निर्जंतुक करून पुन्हा वापरात येण्याजोगे अथवा स्वच्छ रुमालाने तोंड झाकणे आवश्यक राहील. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द साथ रोग प्रतिबंधक अधिनियम, 1897 आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005 व भारतीय दंड संहिता, 1807 चे कलम 188 नुसार कारवाई अंतर्गत संबंधित व्यक्तीस 500 रुपये दंड आकारण्यात येईल. याची यावल, रावेर तालुक्यातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी. असे उपविभागीय अधिकारी तथा उपभिागीय दंडाधिकारी, फैजपुर भाग, फैजपुर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणूमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणून घोषित केलेला आहे. कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यामध्ये होत आहे. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधक कायदा, 1897 लागु करून खंड 2 ते 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेल्या आहेत. फैजपुर शहरात कोरोना संसर्ग संशयीत रुग्ण नसले तरी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आदेशानुसार फैजपुर भाग, फैजपुर यांची कोरोना विषाणू संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्ती केली आहे.