<
जळगाव (दि.15) प्रतिनिधी – कोरोना विषाणु प्रादुर्भामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. सर्वसामान्यांना आरोग्यासह चांगल्या सेवा देता यावे यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अनेक उद्योजक, स्वयंसेवी संस्था, धार्मिक स्थळे मदत करीत आहे. या निधीत सहभाग असावा यासाठी पद्मालय मंदिर देवस्थान विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष अशोक जैन आणि सदस्य मंडळाने सकारात्मक प्रतिसाद देत पद्मालय देवस्थानातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख रूपयांचा धनादेश देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्याकडे मंदिराचे विश्वस्त शिरीष बर्वे यांनी धनादेश सुपूर्द केला.
‘कोविड-19’ च्या निवारणासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसह शक्य ती मदत करण्याचे आवाहन गणपती मंदिर देवस्थान चे अध्यक्ष अशोक जैन यांनी सर्व विश्वस्तांना केले. धर्मदाय आयुक्त यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत या कार्यासाठी पाच लाख रुपयांचा निधी सर्व संमतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी देण्यास सर्व विश्वस्तांनी मंजूरी दिली.