<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 15 :- सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील 14 मार्च, 2020 च्या पत्रानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू करण्यात आलेला आहे. कोरोनाचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होत असल्याने कोरोना विषाणुच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 चे आदेश 15 एप्रिल पर्यंत लागू करण्यात आलेले आहेत. सदरचे आदेश नमूद तरतुदी, अटी व शर्तीसह संपूर्ण जळगाव जिल्हयाकरीता 30 एप्रिलपर्यंत कायम ठेवण्यात येत आहे.
त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची वाहतूक करणारी वाहने यांना जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश व जळगाव जिल्ह्यातून निर्गमन करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी 23 मार्च, 2020 रोजी निर्गमित केलेले आहेत. या आदेशातील नमूद तरतुदी, अटी व शर्तीसह 30 एप्रिल, 2020 पर्यंत कायम ठेवण्याबाबतचे आदेश आज पारीत केले आहे.
त्याचबरोबर औद्योगिक आस्थापनांच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे आपत्तीजन्य परिस्थिती जळगाव जिल्ह्यात उद्भवू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व उद्योग, कारखाने, कंपनी व तत्सम आस्थापना (अत्यावश्यक वस्तु व सेवा पुरविणाऱ्या कंपन्या/कारखाने/उद्योग/व्यवसाय वगळून) 14 एप्रिलपर्यंत पूर्णपणे बंद करणेबाबतचे आदेश पारीत करण्यात आले होते. सदरचे आदेश हे या आस्थापनांना नमूद तरतुदी, अटी व शर्तीसह 30 एप्रिल, 2020 पर्यंत कायम ठेवण्याबाबतचे आदेश आज पारीत केले आहे.
तसेच करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना व दक्षता याचा एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात लोकांचा समुह एकत्र जमु न देण्यासाठी, संपुर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये घेणेत येणाऱ्या सभा, मेळावे, सामाजिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरुस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम, क्रिडास्पर्धा, इत्यादीवर बंदी तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार 15 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आलेले आहे. यामध्ये वाढ करुन हे आदेश नमूद तरतुदी, अटी व शर्तीसह दिनांक 30 एप्रिल, 2020 पर्यंत वाढविण्यात येत आहे.
याचबरोबर करोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव हे संकट पाहता सर्वसामान्य जनतेस व त्यांचे आरोग्यास धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. नागरीकांची गर्दी होऊ नये या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव शहर महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रामधील व ग्रामीण क्षेत्रामधील दुचाकी वाहने, चारचाकी वाहने, अनावश्यकरीत्या फिरणारी इतर वाहने यावर निर्बंध घालणे आवश्यक असल्याने पेट्रोल, डिझेल पंप यासाठी यापूर्वीच वेळ निर्धारित केली आहे. सदरचे आदेश हे दिनांक 3 मे, 2020 चे रात्री 00.01 वाजेपर्यंत कायम ठेवण्यात येत आहे.