<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 16 – सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र दिनांक 14 मार्च, 2020 अन्वये करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करण्यात आलेली आहे.
कोरोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग म्हणून जळगाव जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका/ नगरपंचायत क्षेत्रातील व या शहरांच्या 3 किलोमीटर परिसरातील सर्व पेट्रोल/ डिझेल पंप केवळ सकाळी 7 ते 10 व दुपारी 4 ते सायं 7 वाजेपर्यंतच सुरु राहण्याबाबत आदेशीत करण्यात आलेले आहे.
माल वाहतूक करणा-या वाहनांना पेट्रोल/डिझेलची निर्धारीत वेळेव्यतिरीक्त आवश्यकता भासू शकते. त्यामुळे माल वाहतूक करणा-या व अन्य वाहनांची राष्ट्रीय महामार्गावर होणारी इधन भरण्याची गैरसोय दुर करणे क्रमप्राप्त असल्याने जळगाव जिल्हयातील सर्व नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रातील व या शहरांच्या 3 किलोमीटर परिसरात असलेले पेट्रोल/डिझेल पंप वगळून, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753-जे मौजे जळगाव-पाचोरा-भडगाव-चाळीसगाव-नांदगांव, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 मौजे धुळे-जळगाव-चिखली, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753- एक मौजे जळगाव-पहुर-सिल्लोड-औरंगाबाद, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753- एल मौजे पहूर-जामनेर-बोदवड-मुक्ताईनगर-ब-हाणपूर या राष्ट्रीय महामार्गावर असलेले पेट्रोल/डिझेल पंप यांना सर्व प्रकारची माल वाहतूक करणा-या वाहनांना इंधन विक्री करण्यासाठी वेळेचे कोणतेही बंधन असणार नाही. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी पारीत केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन ही भारतीय दंड संहिता 1860(45) चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील. असेही डॉ. ढाकणे यांनी कळविले आहे.
शेती उपयोगी यंत्रानांही नागरी भागातील पेट्रोल पंपावर इंधन मिळणार
जळगाव जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील व त्यांच्या 3 किलो मीटर परिसरातील सर्व पेट्रोल/ डिझेल पंपचालक यांनी निर्धारीत केलेल्या वेळेत शेतक-यांची यंत्रे, ट्रॅक्ट्रर व तत्सम वाहनांना पेट्रोल/डिझेल उपलब्ध करुन देण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी दिले आहे.
या आदेशाचे उल्लघन केल्यास ही बाब भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील, असे डॉ. ढाकणे यांनी कळविले आहे.
कलम 144 चे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीसांना प्राधिकृत
क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 व मुंबई पोलिस अधिनियम 1951 तसेच करोना विषाणूचा (कोव्हिड 19) प्रादुर्भाव रोखण्याचे अनुषंगाने निर्गमित केलेले सर्व आदेश पारित केलेले आहेत. अशा आदेशांचा भंग करणा-या व्यक्तींविरुध्द भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार पारित केलेल्या आदेशाचे दिनांकापासून गुन्हे दाखल करणेकामी जळगाव जिल्ह्यातील संबंधीत पोलीस अधिकारी/ कर्मचारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. असे आदेश डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव यांनी निर्गमित केले आहे.