<
जळगांव(प्रतिनिधी)- शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शहरी भागातील सरकारी शाळेत शिल्लक असलेला तांदूळ विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे, असे आदेश जी.प.प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी.एस.अकलाडे यांनी काढले आहेत . शालेय स्तरावर नियोजन करून विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप करणार आहेत. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशावरून शहरी भागात शालेय स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ शालेय व्यवस्थापन समितीच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जगभर पसरलेला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार राज्यातील शाळा, महाविद्यालये पुढील काही दिवस बंद असून, देशभर 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू आहे. राज्यातील शाळा व अंगणवाडी बंद असल्यामुळे लहान बालके व विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित राहू नये, त्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना तांदूळ वाटप करण्याच्या सूचना शालेय शिक्षण संचालक यांनी दिल्या आहेत. शाळेत गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी. विद्यार्थी अथवा पालकांना शाळेत बोलावून तांदूळ वाटप करावे. विद्यार्थ्यांना अथवा पालकांना एकमेकांपासून एक मीटरच्या अंतरावर उभे करावे. लॉकडाऊन काळात प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून शालेय स्तरावरील वाटपाची नोंद करावी असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.