<
जळगाव परिमंडळ : महावितरणने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकहीतार्थ मीटर रिडींग, वीज देयक वाटप व वीजदेयक भरणा केंद्राव्दारे देयकांच्या स्वीकृतीस तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र वीजग्राहकांना महावितरण मोबाईल ॲप वा अधिकृत संकेतस्थळावर आपले मासिक वीज देयक ऑनलाईन भरण्याची व ॲपवर आपले सेल्फ मीटर रिडींग नोंदविण्याची सुविधा उपलब्ध आहे. तेंव्हा ग्राहकांनी डिजिटल सुविधांचा वापर करावा,असे आवाहन जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता मा.श्री. दिपक कुमठेकर यांनी केले आहे.
महावितरणने वीजग्राहकांच्या वेळ, श्रम व पैशांची बचत करीत घरबसल्या अधिकृत संकेतस्थळाच्या www.mahadiscom.in व मोबाईल ॲपच्या माध्यमातून वीजविषयक सुविधा एका क्लिकवर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ग्राहकांना ऑनलाईनव्दारे सहज सोप्या पध्दतीने नेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, डिजिटल वॉलेट ,कॅश कार्ड, युपीआयव्दारे वीज बिल भरण्याची सुविधा निशु:ल्क उपलब्ध आहे. विहीत कालमर्यादेत देयक भरल्यास ग्राहकांना वीजदेयकाच्या रक्कमेत 0.25 टक्के डिजिटल देयक भरणा सुट दिली जाते. डिजिटल पध्दतीने वीजदेयक भरणा सुरक्षित असुन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या पेमेंट व सेटलमेंट ॲक्ट 2007 च्या तरतुदी लागू आहेत. चालू महिन्यात 54 हजार 451 वीजग्राहकांनी 5 कोटी 68 लक्ष रूपये ऑनलाईन वीजदेयक रक्कमेचा भरणा केला आहे.
ग्राहकांना आपल्या मीटर रिडींगनुसार वीजदेयक प्राप्त करण्यासाठी महावितरण मोबाईल ॲपव्दारे सेल्फ मीटर रिडींग नोंदविण्याची सोय आहे. ज्या ग्राहकांनी मीटर रिडींग नोंदविले नाही त्यांना सरासरी वीजवापराचे देयक पाठविले जाते आहे. महावितरण ॲप ग्राहकांना गुगल प्ले स्टोअर https://play.google.com/store/apps/details?id=com.msedcl.app या लिंकवरून वा ॲप स्टोअर वरून डाऊनलोड करता येईल.ॲप डाऊनलोड केल्यानंतर आपण्यास पाहुणा वापरकर्ता म्हणूनही ॲप वापरता येईल. सदस्य बनण्यासाठी वीजग्राहक क्रमांक, मोबाईल क्रमांक, ई-मेल नोंद करणे आवश्यक आहे. प्रवेशनाम (युजरनेम) व परवलीचा शब्द(पासवर्ड) निवडून ॲपवर नोंदणी करावी.
सेल्फ मीटर रिडींग पाठविण्याबाबत महावितरणकडे मोबाईल क्रमाकांची नोंदणी केलेल्या ग्राहकांना ‘एसएमएस’ पाठविण्यात येतो आहे. ज्या ग्राहकांना ‘एसएमएस’ प्राप्त नाही असे ग्राहक मागील महिन्यातील उपलब्ध वीजदेयकावरील वीज मीटर रिंडीगची तारीख पाहून त्या तारखेपासून 1 ते 5 दिवसात आपले रिडींग ॲपव्दारे नोंदवू शकतात, मात्र ॲपवर सदस्य बनावे लागेल. ग्राहकांनी आपल्या वीजमीटरवरील केडब्लूएच परिमाण वा एकक असलेले अंक नोंदवून वीजमीटर रिडींगचे छायाचित्रही ॲपवर अपलोड करायचे आहे.
महावितरणकडून वीजग्राहकांना अद्यावत ठेवण्यासाठी मोबाईलवर वीज बंद कालावधी, मीटर रिडींग, वीज बिल बाबतचे लघुसंदेश / ‘एसएमएस’ पाठविण्याची सुविधा सुरू आहे.मोबाईल क्रमांक नोंदविण्यासाठी ग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG <बारा अंकी ग्राहक क्रमांक > टाईप करून 9930399303 या क्रमांकावर पाठवावा किंवा महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर https://consumerinfo.mahadiscom.in/ या लिंकवर वा अॅपवरूनही नोंदणी करता येईल.
ग्राहकांना वीजदेयकाचा एसएमएस पाठविला जातो आहे. वीजदेयक संकेतस्थळावर/ॲपवर पाहता येईल. गो ग्रीन सुविधेसाठी नोंदणी केल्यास ई-मेलवर वीजदेयक पाठविले जाते. जळगाव परिमंडळातील 5 हजार 620 ग्राहक ईमेलवर वीजदेयक व दरमहा वीजदेयकात 10 रूपयांची सुट घेत आहेत.
ग्राहकांनी खंडित वीजपुरवठयाच्या तक्रारीसाठी 022-41078500 या क्रमांकावर मिसकॉल द्यावा अथवा NOPOWER <ग्राहक क्रमांक> हा एसएमएस 9930399303 या क्रमांकावर पाठवावा.