विरोदा(किरण पाटील)- कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जेवणावळीचीही हॉटेले बंद आहेत. त्यामुळे हास्पिटल, मोलमजुरी करीता शहर परिसरात झोपडीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना एकवेळचे अन्न मिळणेही कठीण जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरात बस स्थानक जवळील गुरुदेव प्लाझा व्यापारी संकुल येथे शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. १०० थाळी फैजपूर शहरसाठी मंजूर करण्यात आली आहे कोरोना पार्श्वभूमीवर जेवण हे पार्सल स्वरूपात देण्यात येणार आहे. या केंद्राचा प्रारंभ सोमवारी दि.२० रोजी आमदार शिरीष चौधरी, प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर, लोकनियुक्त नगराध्यक्षा महानंदा होले,मुख्याधिकारी किशोर चव्हाण, स.पो.नि.प्रकाश वानखेडे यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. कोरोना संसर्ग या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य भरात संचारबंदी करण्यात आली आहे. मोलमजुरी करून जगणाऱ्यांना झोपडीतून बाहेर पडणे कठीण झाले आहे. संचारबंदीमुळे अशा व्यक्तींना बाहेर पडून अन्न मिळविणे जिकरीचे होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. शिवाय शहर परिसरात अनेक कुटुंब मजुरी करण्यासाठी आले आहेत. संचारबंदीचा फटका अशाही कुटुंबाना बसत आहे. त्यामुळे शहरात शिवभोजन थाळी केंद्राचा प्रारंभ होत असल्याने अशा व्यक्तींची गैरसोय टळणार आहे. गरजू नागरिकांसाठी अवघ्या पाच रुपयांत शासनाने ठरविलेल्या निकषानुसार जेवण मिळणार आहे. याचा लाभ गरजुंनी घ्यावा, असे आवाहन शिवभोजन थाळी केंद्र संचालक चंद्रकांत जाधव (पप्पू मेस) यांनी केले आहे.