पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
मुंबई – राज्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पाणीपुरवठा केंद्रावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व 25 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. केंद्र शासनाने कोरोना प्रादुर्भावाच्या अनुषंगाने कार्यरत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी तसेच राज्याच्या ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर पाणीपुरवठा विभागाने हा निर्णय घेतला आहे
या निर्णयानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पाणीपुरवठा केंद्रावर कार्यालयात असणारे व अत्यावश्यक सेवेमध्ये समाविष्ट असणारे व गट क आणि गट-ड मधील नियमित कर्मचारी, रुपांतरित आस्थापनेवरील कर्मचारी तसेच प्राधिकरणाअंतर्गत जे कर्मचारी अद्यापही कार्यरत आहेत असे कंत्राटी कर्मचारी अशा सर्वांना 90 दिवसाच्या कालावधीकरिता प्रत्येकी 1 हजार रुपये इतका प्रोत्साहनपर भत्ता देण्यात येणार असून 25 लाख रुपयांचे विमा संरक्षणही देण्यात येणार आहे. राज्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पाणीपुरवठा केंद्रावरील सुमारे 2 हजार 800 कर्मचाऱ्यांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे असे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील एकूण 50 पाणीपुरवठा केंद्रामार्फत ग्रामीण तसेच शहरी भागात किरकोळ व ठोक पद्धतीने पाणीपुरवठा करण्यात येतो. पाणीपुरवठा केंद्रावरील कर्मचाऱ्यांकडून प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची संबंधित गळती थांबवणे, पंप चालू करणे , व्हॉल्व उघडणे व बंद करणे ,मिटर रिडींग घेणे, बिले वाटणे ,वसुली करणे, जलशुद्धीकरण केंद्रावरील आवश्यक कामे करणे इत्यादी प्रकारचे काम अहोरात्र केले जात आहे. त्यांचे काम हे अत्यावश्यक सेवेत येते. त्यामुळे त्यांना प्रोत्साहनपर भत्ता तसेच विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व यासंबंधीचा शासन निर्णयही आज जारी करण्यात आला आहे अशी माहितीही पाणीपुरवठा मंत्र्यांनी यावेळी दिली.