मुंबई – (प्रतिनीधी) – करोनाशी लढा देत असताना राज्याच्या अर्थव्यवस्थेचा गाडा गाळात रुतला आहे. अर्थव्यवस्था ढासळू नये म्हणून २० एप्रिलपासून काही भागात काही उद्योग आणि सेवा क्षेत्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने करोनाचा पार्श्वभूमीवर रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील काही प्रमाणात उद्योग, सेवा सुरू करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. या जिल्ह्यात मालवाहतूक सुरू राहिल, दोन जिल्ह्यांमध्ये मालवाहतूक करता येणार नाही. तसेच सर्व सामान्यांसाठीही जिल्हाबंदी कायम राहणार आहे तसेच या काळात कामगारांची वाहतूक करता येणार नाही, त्यांची व्यवस्था कामाच्या ठिकाणी करावी, असेही त्यांनी स्पष्ष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेला संबोधित केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, शेती आणि कृषी वस्तूंवर बंधन नाही, जीवनावश्यक वस्तूंवर बंदी नाही, मालवाहतूक होईल पण जिल्हाबंदी कायम राहणार आहे. किमान ३ मेपर्यंत बंधन पाळणे आवश्यक आहे. वृत्तपत्रांवर बंदी नाही. पेपर स्टॉलवर वृत्तपत्र विक्री सुरु होईल पण मुंबई, पुणेसारख्या शहरात घरोघरी वृत्तपत्र वितरणास बंदी कायम राहील. महाराष्ट्रासाठी वाईटपणा घेण्यास तयार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लवकर रुग्णालयात या, बर होऊन घरी जा
महाराष्ट्रात शनिवारपर्यंत ६६ हजार ७९६ कोरोना टेस्ट केल्या आहेत यातील ९५ टक्के लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. ३ हजार ६०० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. ३०० पेक्षा जास्त लोकांना कोरोनावर उपचार करुन घरी पाठवले आहे. ज्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह येतोय त्यातील ७५ टक्के सौम्य लक्षण असणारे रुग्ण आहेत. जे गंभीर रुग्ण आहेत त्यांना वाचवण्यासाठी प्राधान्य आहे. करोनाची लक्षणे दिसून आल्यानंतर नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. अगदी शेवटच्या स्टेजला असताना करोनाचा संसर्ग झालेले हे रुग्ण रुग्णालयात येते आहेत. मात्र असा उशिर न करता सर्दी, खोकला, ताप अशी करोना सदृश्य लक्षणे दिसून आली की तातडीने रुग्णालयात जावे. तुम्ही लवकर रुग्णालयात आलात, तर बर होऊनच घरी जाल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी लोकांना दिला.