जळगाव (जिमाका वृत्तसेवा) दि. 19 :- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेचा भाग म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती होण्यासाठी पत्रकारही आपली भूमिका चोखपणे बजावत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही २५ लाख रूपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळावे. यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती आज राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथाजळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली.
सध्या लॉकडाऊनमुळे बहुतांश उद्योग, व्यापार आणि सेवा बंद आहेत. तथापि, या अत्यंत विपरीत परिस्थितीतही माध्यमांचे प्रतिनिधी आपला जीव धोक्यात घालून आपले काम अतिशय चोखपणे करत आहेत. या पार्श्वभूमीवर, पत्रकारांनाही 25 लाख रूपयांच्या विम्याचे संरक्षण मिळावे याकरिता आपण मुख्यमंत्री यांचेकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही मंत्री श्री. पाटील यांनी दिली. ते आज येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या खात्याच्या अर्थात, मजिप्राच्या पाणीपुरवठा करणार्या राज्यभरातील कर्मचार्यांसाठी २५ लाखांच्या विम्याचे सुरक्षा कवच यापूर्वीच उपलब्ध करून दिले आहे. याच पध्दतीने पत्रकारांनाही विमा संरक्षण उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.