<
जळगांव(प्रतिनीधी)- आपण समाजाचे काही तरी देणं लागतो या भावनेने मौलाना आझाद अल्पसंख्याक समाज विकास फाऊंडेशनच्या वतीने आज शहराला लागून असलेल्या मोहाडी-शिरसोली रोडवरील झोपडपट्टीतील गरीब व गरजूंना एक महिन्याचा किराणा वाटप करण्यात आला.
मौलाना आझाद फाऊंडेशनच्या सदस्यांनी सर्वप्रथम या भागातील गरीब रहिवाश्यांचा सर्वे करुन ज्यांना आजपावेतो कुठलीही मदत पोहचली नाही अशा गरजूंना यावेळी एक महिना पुरेल एवढा किराणा किट वाटप करण्यात आला. या समाजाच्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचा सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व स्तरातून घोषणा करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने गरजूंसाठी विविध हात समोर येत असून याचाच एक भाग म्हणून मौलाना आझाद फाऊंडेशनच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम दरवेळेस राबविण्यात येतात. प्रसंगी देण्यात आलेल्या किराणा किट मध्ये गहु, तांदूळ, तूर डाळ, उडीद डाळ, शेंगदाणे, तेल, साखर, चहा पत्ती, विविध मसाले, अंघोळीचे व कपड्याचे साबण, लहान मुलांना चाँकलेट-बिस्कीट असा महिनाभर पुरेल एवढा किराणा सोशल डिस्टनिंगचे तंतोतंत पालन करून गरजूंना देण्यात आला. या उपक्रमाला सदगुरु भक्तराज शिक्षण प्रसारक मंडळाचे भारती चौधरी, अमित माळी, गायत्री पल्सेसचे निखिल ठक्कर, स्वामी समर्थ संस्थेचे प्रतीक्षा पाटील, हर्षाली पाटील, ज्योती राणे यांचे अनमोल सहकार्य लाभले तर यावेळी फाऊंडेशन अध्यक्ष फिरोज शेख यांच्यासह प्रा.नारायण पवार, प्रतीक्षा पाटील, अमित माळी, राजीव पाटील, चेतन निंबोळकर, महेंद्र पवार, हमीद खाटीक, जुबेर खान आदी उपस्थित होते. प्रसंगी
फिरोज शेख यांनी सर्व सामाजिक संस्था आणि मित्र परिवाराला पुढे येऊन गरजूंना मदत करण्याचे आवाहन केले. तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देखील फाऊंडेशनच्या वतीने मदत करणार असल्याचे ते यावेळी बोलले.