<
पाचोरा(प्रमोद सोनवणे)- आज जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे तसेच पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी पाचोरा येथील शक्ती धाम येथे मजुरांच्या निवारा गृहास भेट दिली. गत तीन दिवसापासून शासनाने स्थापन केलेल्या या निवारा गृहांमध्ये एकूण 43 परप्रांतीय मजूर असून त्यामध्ये सहा महिला व चार बालकांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी संयुक्तपणे सदर ठिकाणची पाहणी केली व मजुरांची संवाद देखील साधला. मजुरांना देण्यात येणाऱ्या सुविधांची देखील पाहणी केली.
तसेच प्रशासन व विविध सामाजिक संस्था यांनी केलेल्या उपक्रमाचे कौतुक देखील केले. मजुरांशी संवाद साधताना सदर मजुरांना दिनांक 3 मे पर्यंत या ठिकाणी थांबावे लागेल तसेच त्यांना स्थानिक कामातून रोजगार देण्याबाबतही आवश्यक त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्वर कातकडे, तहसीलदार कैलास चावडे, पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, नायब तहसीलदार अमित भोईटे, शक्ती धाम श्री मोर तसेच महिंद्र अग्रवाल, बांठिया यांचे समवेत स्थानिक तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल तसेच नगरपालिकेचे कर्मचारी आदी उपस्थित होते.