<
नंदुरबार -शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या कुटुंबातील इतर तीन व्यक्तींना संसर्ग झाला असून त्यांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तिघा व्यक्तींमध्ये आजाराची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नसून (असिम्प्टमॅटीक) त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिली आहे.
तिघांपैकी एक 65 वर्षाची महिला, 15 वर्षाची मुलगी आणि 21 वर्षाचा तरुण आहे. या तिन्ही व्यक्तींना यापूर्वीच क्वॉनंटाईन करून आवश्यक उपचार सुरू करण्यात आले होते. आज आलेल्या अहवालापैकी 11 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
कोरोनाग्रस्त रुग्ण रहात असलेला भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. या भागात साधारण साडेनऊशे कुटुंब असून 4632 नागरिक रहातात. या क्षेत्राला 18 उपक्षेत्रात विभागण्यात आले असून प्रत्येक विभागासाठी ए पथक कार्यरत करण्यात आले आहे.
प्रत्येक उपक्षेत्रात नगर पालिका कर्मचारी किंवा शिक्षकांच्या नेतृत्वाखाली दोन स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक सकाळी 8 ते 10 या वेळेत येथील रहिवाशांकडून आवश्यक वस्तूंची माहिती घेईल आणि सायंकाळी 5 ते 7 च्या दरम्यान या वस्तू घरपोच पोहोचविण्यात येतील. दूधाचे वितरण घरोघरी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बँकेतून पैसे काढण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे सहकार्य घेण्यात येत आहे.