<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 20 – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाकडील 14 मार्च रोजीच्या पत्रानुसार राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा 13 मार्च 2020 पासून लागू करण्यात आला आहे. तसेच यातील खंड 2 ते 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीची अधिसूचना निर्गमीत करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्रात कोव्हिड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना आवश्यक आहेत, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार तसेच उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना जिल्हाधिकारी जळगाव यांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेले आदेश निर्देश/सुचनांचे पालन व अंमलबजावणी करण्यासासंदर्भात त्यांच्या कार्यक्षेत्रात त्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. याचअनुषंगाने जळगाव जिल्हा हद्दीत प्रवेश व जळगाव जिल्ह्यातून निर्गमन करण्यास प्रतिबंध (सीमाबंदी) करणेसाठी आदेश यापूर्वीच निर्गमित करण्यात आलेले असून उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाद्वारे कार्यवाही सुरू आहे. महाराष्ट्र शासनाकडील अधिसूचना व भारत सरकार यांचेकडील 19 एप्रिलच्या आदेशानुसार आरोग्य, कृषी उत्पादन, फलोत्पादन व त्यासंबंधित सर्व उपक्रम व अशाच काही जीवनावश्यक वस्तू/साधनसामग्रीच्या विक्री तसेच ने-आण करण्यास सवलती देण्यात आल्या आहे. त्यामुळे जिल्हा सीमा उल्लंघन होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने अधिक सतर्कता बाळगण्याच्या हेतूने सीमाबंदी आदेशाचे उल्लंघन टाळण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी तसेच तालुका दंडाधिकारी यांना जबाबदार अधिकारी/कर्मचारी यांचे पथक नियुक्तीचे आदेश दिले आहेत. सीमाबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण, जळगाव वामन कदम यांनी एका प्रसिदी पत्रकान्वये कळविले आहे.