<
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
जळगाव, दि. 21 (जिमाका) – लॉकडाऊनच्या काळात जळगाव जिल्ह्यातील सर्व देशी /विदेशी मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले होते. असे असूनही लॉकडाऊन कालावधीमध्ये मे. क्रिश ट्रेडर्स, एफएल-1, अनुज्ञप्ती क्र. 12, नशिराबाद, ता. जि. जळगाव या अनुज्ञप्तीमधून विदेशी मद्य, बीअर व वाईनची विक्री झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 56 (1) (ब) अन्वये प्राप्त अधिकारानुसार त्यांचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला असून तसे आदेश निर्गमित केले असल्याचे नितिन धार्मिक यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनुज्ञप्तीधारक श्री. राजकुमार शितलदास नोतवाणी व भागीदार सौ.अनिता शिरिष चौधरी यांचेकडून जिल्हाधिकारी, जळगाव यांचे आदेश क्रमांक सीएलआर/एफएलआर-112020/आव्य/ दिनांक 21 व 31 मार्च, 2020, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005, भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, मुंबई विदेशी मद्द नियम, 1953 चे नियम 10 (1) (ब), 15, 16, 21 (3) (ब), 21 (5) 22 तसेच एफएल-1 अनुज्ञप्ती शर्त क्रमांक 2 व 7, महाराष्ट्र विदेशी मद्य (रोखीने विक्री व विक्रीच्या नोंदवह्या इत्यादि) नियम 1969 चे नियम 9 व 14 (1) या नियमांचा भंग केला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांना अशाप्रकारे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारक व भागीदार यांनी मुंबई विदेशी मद्द नियम, 1953 व महाराष्ट्र विदेशी मद्द (रोखीने विक्री व विक्रीच्या नोंदवह्या) नियम 1969 तसेच एफएल-1 अनुज्ञप्तीच्या अटी, शर्तीचा भंग केल्याचे सिध्द होत असल्याने नशिराबाद येथील मे. क्रिश ट्रेडर्स यांचे कडील एफएल-1 अनुज्ञप्ती क्रमांक 12 कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याचे अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, जळगाव नितीन धार्मिक यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.