<
जळगाव. दि.21 (जिमाका)- सेवायोजन कार्यालये रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा अधिनियम 2 सप्टेंबर, 1959 पासून अंमलात आलेला आहे. त्याअतंर्गत राज्य शासनातर्फे सेवायोजन कार्यालयांतर्गत रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणेबाबतचे नियम 1 मे 1960 पासून अंमलात आलेले आहेत. तसेच रिक्तपदे भरण्याबाबत सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अधिन राहून सामान्य प्रशासन विभागाच्या 19 नोव्हेंबर, 2003 च्या परिपत्रकात संबंधित आदेश निर्गमित केलेले आहे.
शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळे, सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी आस्थापना (25 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत) अशांनी रिक्त पदे भरतांना राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाच्या www.maswyam.gov.in या संकेतस्थळावर त्यांच्याकडील रिक्त पदे अधिसूचित करणे बंधनकारक आहे. पात्र उमेदवारांच्या याद्या डाऊनलोड करून घ्यावयाच्या आहेत. सर्वोच्य न्यायालाच्या आदेशानुसार कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड केलेली यादी व जाहिरातीनुसार आलेले अर्ज यामधुन पात्र उमेदवारांची विहित पध्दतीनुसार निवड करण्यात यावी.
सर्वोच्य न्यायालयाचे आदेश असताना सुध्दा अनेक आस्थापनांकडून भरती प्रक्रीया करतांना सर्वोच्च न्यायालयाचे आदेश पाळण्यात येत नसल्याचे निदर्शनात येत असते. तरी भरती प्रक्रीय करताना कायद्याचे उल्लंघन केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल. असे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्द्योजकता, जळगाव श्रीमती अनिसा तडवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.