<
डॉ. स्नेहल फेगडे सचिव IMA जळगाव यांनी देखील प्रतिक्रिया देऊन या निषेधमध्ये सहभागी होण्यासाठी केले आवाहन
जळगांव(प्रतिनिधी)- देशभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी भारतातील डॉक्टर्स जीवापाड प्रयत्न करत आहेत. तरीही डॉक्टरांवर होणारे हल्ले आणि समाजाकडून त्यांची होणारी वंचना यामध्ये वाढ होत आहे. अशा असंख्य अनुचित प्रकारांबाबत इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य सखेद निषेध करीत आहे. याबाबत एक प्रतिक्रिया म्हणून दि. २२ एप्रिल आणि दि.२३ एप्रिल २०२० रोजी आम्ही प्रतिकात्मकरित्या निषेध व्यक्त करणार आहेत. कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या, आयएमएचे सदस्य असलेल्या डॉ. लक्ष्मीनारायण रेड्डी, या ऑर्थोपेडिक सर्जन असलेल्या तरुण डॉक्टरांचा करोनाची लागण होऊन मृत्यू झाला. या डॉक्टरांच्या अंत्यसंस्कारामध्ये तेथील स्थानिक लोकांनी अडथळा निर्माण केला. अंत्ययात्रेसाठी आलेल्या डॉक्टरांच्या शोकाकुल परिवारावर अमानुष हल्ला केला गेला. एवढेच नव्हे तर डॉक्टरांच्या मृतदेहाबाबत अत्यंत अशोभनीय, असंस्कृत आणि अमानवी वर्तन तेथील समाजकंटकांनी केले.आश्चर्याची बाब म्हणजे सरकारी यंत्रणा हे वर्तन रोखण्यात पूर्णपणे अपयशी ठरली. अशाच घटनांची पुनरावृत्ती डॉ. सायमन आणि डॉ. सिओलो यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारा बाबत झाली. एकीकडे कोरोना वॉरियर म्हणून उल्लेख करणाऱ्या सरकारला अशाप्रकारच्या घटना रोखण्याची इछाच नसल्यास आम्ही दाद कुणाकडे मागायची हा प्रश्न आयएमएच्या सर्व सदस्यांना चिंतीत करून सोडतो आहे. कोरोनाच्या साथीची भयावह राष्ट्रीय आपत्तीमध्ये रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची तमा न बाळगणाऱ्या डॉक्टरांवर आज अनेक ठिकाणी अत्याचार होत आहेत, मारहाण होत आहे, त्यांच्या इस्पितळाना बंद करायला सांगितले जात आहे, त्यांना सोसायट्यांमध्ये प्रवेश नाकारला जातोय, सामाजिक बहिष्कार टाकला जातोय, निवास नाकारला जातोय. डॉक्टरांच्या अंत्यसंस्काराला केलेला अडथळा ही त्यातील सर्वात उद्विग्न करणारी घटना आहे. या साऱ्या घटनांमध्ये डॉक्टरांनी कमालीचा संयम राखला आहे, पण मृत्यू पावलेल्या डॉक्टरांच्या शवाची विटंबना सहन करणे हा आजवर पाळलेल्या संयमाचा अंत आहे. या साऱ्या घटनांचा विचार करून आम्ही इंडियन मेडिकल असोसिएशनचे भारतभरातले सदस्य, अशी रास्त मागणी करतो की, अध्यादेशाद्वारे डॉक्टर, परिचारिका, आरोग्यसेवा कर्मचारी आणि रुग्णालयांवरील हिंसाचाराविरोधात विशेष केंद्रीय कायदा करावा. समाजाने हे लक्षात घ्यावे की डॉक्टर्स आणि इतर सारे वैद्यकीय स्वतःच्या जीवाला असलेला धोका पत्करून सेवा देत आहेत. कोणतीही राष्ट्र त्यांच्या सैन्याला युद्धावर पाठवताना निःशस्त्र पाठवत नाही. पण या देशातील डॉक्टर्स, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्याना योग्य ते पीपीई न देता कोव्हिड-१९ विरुध्दच्या लढ्यावर निःशस्त्र धाडले आहे.आणि तरीही आपल्या देशबांधवांना जीवनदान देताना ते मृत्युला सामोरे जात आहेत. आणि अशा परिस्थितीत मालेगाव, मुरादाबाद, दिल्ली, तेलंगणा येथे डॉक्टरांविरुध्द हिंसक घटना घडत आहेत. अशावेळेस इतर व्यावसायिकांप्रमाणे स्वस्थपणे घरी बसणे डॉक्टरांना शक्य आहे, पण आपला देश असा कोरोनाच्या आगीमध्ये जळत असताना आयएमएसारखी संस्था असा स्वार्थी विचार करत नाही. समाजधुरीणांनी विचार करावा की डॉक्टर्स मृत्युच्या धोक्याला आणि समाजाच्या वागणुकीची प्रतिक्रिया म्हणून घरी बसले तर काय होईल?
व्हाईट अलर्ट
या साऱ्या घटनांचा निषेध म्हणून आणि डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी हिंसाचार विरोधी केंद्रीय कायदा व्हावा या मागणीसाठी आयएमए दि. बुधवार दि. २२ एप्रिल २०२० रोजी राष्ट्राला एक पांढरा इशारा देणार आहेत. या दिवशी रात्री ९ वाजता भारतातील आयएमएचे ४ लक्ष सदस्य डॉक्टर्स आणि रुग्णालये एक-एक मेणबत्ती पेटवून ठेवतील आणि राष्ट्राला पांढरा इशारा देणार आहेत.
आमचा पांढरा रंग लाल होऊ देऊ नका, डॉक्टरांना सुरक्षित राहू द्या, रुग्णालये सुरक्षित राहू द्या, अध्यादेशाद्वारे केंद्रीय कायदा लागू करा, आमची सुरक्षा हीच आमची मागणी असे मुद्दे ते यावेळी मांडणार आहेत. व्हाईट अॅलर्टनंतरही डॉक्टर आणि रुग्णालयांवरील हिंसाचाराबाबत केंद्र सरकार कायदा करण्यास सरकार अपयशी ठरल्यास. आयएमए गुरुवार २३ एप्रिल २०२० रोजी काळा दिवस म्हणून जाहीर करेल.
या दिवशी देशातील सर्व डॉक्टर काळी फीत लावून आपले काम करतील. काळा दिवसानंतरही शासनाने योग्य पावले उचलली नाहीत तर त्या पुढील पावले उचलणारे निर्णय घेतले जातील असा इशारा आयएमए कडून देण्यात आला आहे.