<
ठाणे – हरवलेला एखादा मोबाइल किंवा चोरीला गेलेला सोन्याचा ऐवज तसेच गाडी असो परत मिळेल की नाही, याची प्रत्येकाला खात्री नसते. वस्तूंची आस लागलेले अनेकजण वारंवार पोलिस ठाण्यात चकऱ्या मारतात. अखेर वस्तू मिळणार नाही, अशी स्वत:ची समजूत घालत पोलिसांकडे होणारा पाठपुरावा अखेर बंद होतो. मात्र, ठाणे पोलिसांच्या अथक मेहनतीमुळे नागरिकांचा मुद्देमाल परत मिळाला असून परिमंडळ पाचमधील विविध पोलिस ठाण्यांत दाखल असलेले गुन्हे आणि मिसिंग प्रकरणातील जप्त केलेला सुमारे एक कोटीचा मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रम नुकताच झाला.
वागळे इस्टेटमधील एका हॉलमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या हस्ते नागरिकांना त्यांचा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमाला १५० ते २०० उपस्थित नागरिकांसह सहायक पोलिस आयुक्त प्रकाश निलेवाड यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात घरफोडी, जबरी चोरी, फसवणूक आदी वेगवेगळ्या गुन्ह्यांतील ३१ लाख ७७ हजार ५०० रुपये किमतीचे ८४ तोळे सोन्याचे दागिने, मोबाइलचोरी तसेच अन्य प्रकरणातील २४ लाख ४८ हजार ५०० रुपये किमतीचे १५६ मोबाइल, चोरीच्या गुन्ह्यातील १६ मोटारसायकली, नऊ चारचाकी गाड्या आणि दोन लॅपटॉप असा सुमारे १ कोटी ४ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नागरिकांना परत करण्यात आला आहे.