मुंबई-(सुशीलकुमार सावळे) – मारिला डिस्कव्हरी हे जहाज २ ते ६ एप्रिल या कालावधीत कोचीन, न्यू मंगलोर, गोवा आणि मुंबई अशा ठिकाणी पोहोचणार होते. दरम्यान कोरोनाचा उद्रेक सुरु झाला आणि या जहाजाने थायलंड येथे १४ मार्च रोजी सर्व प्रवासी सोडले. त्यानंतर १२ एप्रिल रोजी हे जहाज कोचीन येथे पोहोचले पण या जहाजावरील कर्मचाऱ्यांना उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली. नंतर हे जहाज मुंबईजवळच्या समुद्रात १४ एप्रिल रोजी पोहोचले तेव्हापासून त्यावरील कर्मचारी मुंबईला उतरण्याची वाट पाहत होते. हे जहाज पुढे नॉर्वे साठी रवाना होणार आहे.
जहाजावरील कुठल्याही कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे . थायलंड येथून सोडून ३७ दिवस होऊन गेले मात्र जहाजावर कुठल्याही व्यक्तीस संसर्ग नसल्याचे सांगून सुद्धा परवानगी मिळत नव्हती.
या विषयीचे वृत्त समजताचऑल इंडिया सीफेरर्स आणि जनरल वर्कर्स युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री संजय वासुदेव पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री. अभिजित दिलीप सांगळे यांनी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नौकानयन मंत्री श्री. मनसुख मांडवीय यांच्याशी सातत्याने पाठपुरावा केला व त्या भारतीय खलाशी व कर्मचाऱ्यांच्या सुटकेची मागणी केली होती. याच मागणीला मान देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नौकानयन मंत्री मनसुख मांडवीय यांच्याशी स्वतः संपर्क साधून विनंति केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने काळ उशिराने यासंदर्भातील एक आदेश जारी केला. गुरुवारी सकाळपासून या जहाजावरील खलाशांना व कर्मचाऱ्यांना मुंबई बंदरावर उतरविणे सुरु होईल व त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी एक इमारतही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मारिला डिस्कव्हरी बाबतच्या निर्णयाचा फायदा समुद्रात ठिकठिकाणी जहाजांवर अडकलेल्या हजारो खलाशी व जहाजावरील कर्मचाऱ्यांना देखील होणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे अभिजित दिलीप सांगळे यांनी ऑल इंडिया सीफेरर्स आणि जनरल वर्कर युनियन च्या वतीने व सत्यमेव जयतेच्या माध्यमातून आभार व्यक्त केले.