जातीय रंग देऊ नका; अटक केलेल्यांमध्ये एकही मुस्लिम नाही – गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई, दि.२२ : पालघर जिल्ह्यात घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून माणुसकीला काळीमा फासणारी आहे. घटनेनंतर केवळ ८ ते १० तासात पोलिसांनी १०१ व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यापैकी कोणीही मुस्लिम नाही. या घटनेस कृपया जातीय रंग देऊ नये, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज फेसबुक द्वारे संवाद साधून केले आहे.
ही घटना घडलेली जागा दुर्गम भागात आहे. हा आदिवासी भाग आहे. या परिसरात रात्रीच्या वेळी वेषांतर करून मुले पळवणारी टोळी येत आहे अशा अफवा होत्या. त्यातून हे घडले असावे. याची चौकशी विशेष पोलीस महानिरीक्षक करत असून तपास सीआयडीकडे देण्यात आलेला आहे.
पोलिसांनी घटनेनंतर जंगलात, पहाडावर, डोंगरात लपलेल्यांना केवळ आठ ते दहा तासात ताब्यात घेतले. १०१ व्यक्ती या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यापैकी एकही नाव मुस्लिम नाही.
सध्या आपण कोरोनाच्या विरुद्ध लढाई लढत आहोत. पोलीस विभाग, आरोग्य विभाग तसेच संपूर्ण राज्यच ही लढाई लढत आहे. परंतु या घटनेला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे, हा दुर्दैवी भाग आहे.
ही वेळ राजकारण करण्याची नाही. सर्वांनी एकत्र येऊन कोरोना विरुद्ध लढा द्यावा ,अशी विनंती गृहमंत्र्यांनी केली.