जळगाव-शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत धान्य वितरण करीत नाहीत, रेशनकार्ड धारकांना १२ अंकी नंबर करीता पैशांची मागणी, मद्यपान करुन धान्य वाटप यासह अनेक तक्रारी असलेल्या जळगाव शहरातील रामानंदनगर येथील विमल बाळासाहेब गायकवाड यांचे रेशन दुकानाचे प्राधीकारपत्र रद्द करण्यात आले आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी गुरुवारी ही कार्यवाही केली.
रामानंदनगर येथील रेशन दुकानाचे प्राधीकारपत्र असलेले विमल बाळासाहेब गायकवाड हे शासकीय नियमांचे उल्लंघन करीत असल्यामुळे व स्वस्त धान्य दुकानाच्या खूप तक्रारी असल्याने हे स्वस्त धान्य दुकानाचे गायकवाड यांचे प्राधीकार पत्र रद्द करण्यात यावे व ते किशोर प्रल्हाद पाटील यांना चालविणेस द्यावे, असा अहवाल तहसीलदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर केला होता. त्यानुसार पुरवठा अधिकारी यांनी प्राधीकारपत्र रद्द करण्यात असल्याचे आदेश गुरुवारी काढले आहेत.