<
लॉकडाऊन मधुन आणखी सुट-लॉकडाऊन मध्ये राज्यात रखडलेल्या मेट्रो प्रकल्पांना येणार चालना
मुंबई, दि. २३ – राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमधून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणारे कर्मचारी व काळजीवाहक, पिठाची गिरणी, मुंबई, पुणे व पिंपरी चिंचवड या महानगरपालिका आयुक्तांनी मंजुरी दिलेल्या मेट्रो रेल्वेची कामे व इतर मान्सूनपूर्व कामांना सूट देण्याचा आदेश राज्य शासनाने आज काढला आहे.
राज्य शासनाने आज जारी केलेल्या आदेशात काही सेवांना सूट देण्यात आली आहे. त्यामध्ये पॅक हाऊस, बियाणे व फलोत्पादनाच्या तपासणी व उपचार सुविधांची आयात निर्यात, शेती व बागायतीशी संबंधित संशोधन संस्था, वृक्ष लागवड व मधमाशी वसाहती, मध व त्यासंबंधीच्या उत्पादनांची राज्याअंतर्गत व आंतरराज्यीय वाहतूक, ब्रेड फॅक्टरी, दूध प्रक्रिया प्रकल्प, डाळ मिल, पंख्यांची दुकाने यांचा समावेश आहे. त्याशिवाय वन विभागाच्या कार्यालयासह वनीकरण, वृक्षारोपण व त्यासंबंधित कामांनाही लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या मानकानुसार (एसओपी) भारतीय बंदरांमधील समुद्री जहाजांना आवक-जावक व त्यांच्या हालचालींना परवानगी देण्यात आली आहे.
लॉकडाऊनमधून सूट दिली असली तरी ही कामे करताना शासनाने घोषित केलेले नियम, सामाजिक अंतर व स्वच्छता यांची काळजी संबंधित आस्थापनांनी घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.