<
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 24 – राज्य शासनाने कोरोना विषाणुचा (कोव्हीड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायदा, 1897 दिनांक 13 मार्चपासुन लागु करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासन यांच्याकडील सुधारित आदेश दिनांक 23 एप्रिल, 2020 अन्वये शासनाचे दिनांक 17 एप्रिल, 2020 व 21 एप्रिल, 2020 रोजीच्या आदेशामध्ये सुधारित बाबींचा समावेश केलेला आहे.
त्यानुसार दिनांक 19 एप्रिल 2020 च्या आदेशान्वये लॉकडाऊन मधून वगळण्यात आलेल्या बाबी व घटकांचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.
कृषी उत्पादन फलोत्पादन त्या संबंधित सर्व उपक्रम सुरू ठेवण्याबाबत – आयात व निर्यात व पॅक हाऊस बी-बियाणे फलोत्पादनाशी संबंधित तपासणी व उपचार केंद्र सुरू ठेवणे, संबंधित संशोधन करणाऱ्या आस्थापणा, वृक्ष लागवड मध व मधुमक्षिका पालनाशी संबंधित सर्व बाबींची राज्य अंतर्गत व आंतरराज्य वाहतूक सुरू राहण्याबाबत आदेश निर्गमित केलेले आहे.
सामाजिक क्षेत्राशी संबंधित उपक्रम सुरू होण्याबाबत – ज्येष्ठ नागरिकांची त्यांच्या घरी जाऊन काळजी घेणारे व Bed side attendants व care givers शी संबंधित सर्व घटक सुरू राहतील.
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू करणेबाबत – यामध्ये ब्रेड फॅक्टरीज मिल्क प्रोसेसिंग प्लांट फ्लोअर मिल दाल मिल्स व तत्सम घटक सुरू राहतील.
व्यवसायिक खाजगी आस्थापना सुरू ठेवण्याबाबत – यामध्ये इलेक्ट्रिक फॅन दुकाने सुरू ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.
शासकीय कार्यालय सुरू ठेवण्याबाबत – सामाजिक वनीकरण व त्यांच्याशी संबंधित सर्व कार्यालये सुरू राहतील.
या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल. असेही डॉ. ढाकणे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.