<
- पोलीस निरीक्षक यांच्या दबंगगिरी मुळे नागरिकांमध्ये घबराट
- दंगलीच्या गुन्ह्यात पत्रकारास अटक.
- फैजपूर उपविभागीय अधिकार्याचे दुर्लक्ष
यावल, दि. 24(प्रतिनिधी) – यावल तालुक्यातील डांभुर्णी येथिल घटनेमुळे दिनांक 4 एप्रिल 2020 शनिवार रोजी यावल पोलीस स्टेशनला दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे, गुन्ह्यातील संशयित आरोपीची पूर्ण चौकशी आणि खात्री न करता अटक सत्र सुरू होते आणि आहे ,त्यानुसार तब्बल 20 दिवसांनी दाखल गुन्ह्यात पूर्ण नांव नसलेला संशयित आरोपी म्हणून मनोज नेवे या पत्रकारास दिनांक 24 एप्रिल 2020 शुक्रवार रोजी मध्यरात्री एका अट्टल गुन्हेगाराप्रमाणे अटक केल्याने संपूर्ण यावल तालुक्यात आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत असून यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या दबंगगिरी कडे आणि दैनंदिन कामकाजाकडे फैजपूर उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे सुद्धा आता यावल तालुक्यात बोलले जात आहे.
तालुक्यातील डांभुर्णी येथे दिनांक 3 एप्रिल दोन 2020 शुक्रवार रोजी डांभुर्णी गावातील कैलास चंद्रकांत कोळी या मुलाचा खून झाल्याचे कारणावरून संपूर्ण डांभुर्णी व परिसरातील ग्रामस्थांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता आणि आहे, या गुन्ह्यातील आरोपीस दिनांक चार रोजी यावल पोलिसांनी अटक केली आहे.
खून केलेल्या आरोपीस पकडल्या नंतर यावल पोलिसांनी ग्रामस्थां समक्ष आरोपीची खुलेआम चांगली पिटाई केल्याचे आणि दबंगगिरी कशी असते हे सोशल मीडिया वरून व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिप वरून संपूर्ण जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्राला दिसून आले आहे, या घटनेत काही अप्रिय घटना घडली असती तर फैजपूर उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे व पोलीस अधीक्षक जळगाव जिल्हा यांना या घटनेचा जाब मानवाअधिकार आयोगाकडे द्यावा लागला असता.
याच प्रकारे यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे आपल्या दैनंदिन कामकाजात विविध गुन्हे दाखल करताना सार्वजनिक ठिकाणी आणि यावल पोलीस स्टेशन आवारात सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या एका बंद खोलीत संशयित आरोपींची चांगलीच धुलाई करून आपली दबंग’गिरी निदर्शनास आणीत आहे, अशाप्रकारे दबंगगिरी करताना एखाद्या संशयित आरोपीच्या जीवितास काही धोका निर्माण झाल्यास याला पोलिस उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे व जिल्हा पोलीस अधीक्षक हे सुद्धा जबाबदार राहतील ? असा प्रश्न यावल पोलिस स्टेशन हद्दीत सर्वस्तरातून उपस्थित केला जात आहे.
गेल्या चार दिवसापूर्वी यावल शहरात दोन गटात भांडण झाल्याने एका गटा विरोधात कडक कारवाई झाल्याने त्यांना अद्याप जामीन सुद्धा झालेला नाही. तर दुसर्या गटातील संबंधितांनी संगनमत केल्याने त्यांच्याविरुद्ध नाममात्र गुन्हा दाखल करून त्यातील आरोपी तात्काळ जामिनावर मुक्त झालेले आहेत, गंभीर गुन्ह्यात जामीन न झालेल्या प्रकरणातील जखमी व्यक्तीचा वैद्यकीय अहवाल लक्षात घेता गुन्हा एवढा गंभीर स्वरूपाचा होता का ? असा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात आहे, डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांनी वैद्यकीय अहवालाची आणि घटनेच्या वस्तुस्थितीची चौकशी केल्यास पोलीस निरीक्षक धनवडे यांनी दोन्ही गटा बाबत भेदभाव केला आहे किंवा नाही हे समोर येईल,
त्याचप्रमाणे डांभुर्णी येथील दैनिक तरुण भारत चे वार्ताहर मनोज नेवे यांनी गेल्या पाच वर्षात डांभुर्णी गावातील ग्रामस्थांच्या विविध समस्या आपल्या स्पष्ट आणि निर्भिड लिखाणातून जनतेसमोर आणि अधिकार्यांसमोर वेळोवेळी मांडलेल्या असल्यामुळे डांभुर्णी गांवातील त्या स्फोटक परिस्थितीची संधी साधून फिर्यादीत दिलेल्या मनोज नेवे या अपूर्ण असलेल्या नांवावरुन गेल्या 20 दिवसात यावल पोलिसांनी काय चौकशी केली ? आणि वार्ताहर मनोज नेवे यांस कोणत्या आधारे अटक केली याबाबत यावल तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. फिर्याद देताना फिर्यादीस तथा एका जबाबदार लोकप्रतिनिधीस आपल्याच गावातील मतदाराचे म्हणजे मनोज नेवे याचे पूर्ण नांव माहित नव्हते का ? मनोज नेवे नावाचा माणूस यावल तालुक्यात फक्त एकच आहे का ? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून निर्दोष असलेल्या व्यक्तीस गुन्ह्यात नाहक अडकविण्यात आल्याचे सुद्धा बोलले जात आहे.
लॉकडाऊन सारख्या आपत्कालीन परिस्थिती मध्ये पत्रकारांना पोलिसांकडून मारहाण करणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे अशा पद्धतीने संपूर्ण राज्यभर काम सुरु आहे.तरुण भारत चे वार्ताहर मनोज नेवे यांच्या बाबतीत देखील पोलिसांनी अशाच सूड भावनेतून एखाद्या अट्टल गुन्हेगारासारखे रात्री अटक करण्याचा निंदनीय प्रकार घडला असून आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ या घटनेचा तीव्र निषेध करतो.
– प्रविण सपकाळे
जिल्हाध्यक्ष-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ