<
विविध रोजगार योजनेअंतर्गत कामांच्या संख्येत वाढ
नवी मुंबई, दि. 24:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकण विभागात मनरेगा योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण 4 हजार 515 कामांना सुरुवात झाली असून उपस्थित मजुरांची संख्या 18 हजार 756 झाली आहे. पालघर जिल्ह्यातील कामांना मजुरांचा चांगला प्रतिसाद अशी माहिती कोकण विभागाचे महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांनी दिली आहे.
कोकण विभागातील जिल्ह्यांतर्गत कृषि, वनपरिक्षेत्र, वनप्रकल्प विभाग, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, रेशीम विकास अशा विविध विभागांमार्फत सुरु करण्यात आलेल्या कामांची संख्या व कामावर उपस्थित मजुरांची संख्या अशी –
ठाणे-316 कामे 1 हजार 145 मजूर, रायगड-182 कामे 646 मजूर, पालघर 2 हजार 34 कामे 11 हजार 266 मजूर, रत्नागिरी 1 हजार 155 कामे 3 हजार 398 मजूर, सिंधुदुर्ग 828 कामे 2 हजार 301 मजूर संख्या आहे. यात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक कामे सुरु असून इतर जिल्ह्यांपेक्षा मजुरांची उपस्थिती लक्षणीय आहे. इतर जिल्ह्यांनी देखील कामांची संख्या व मजुरांची उपस्थिती वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन श्री. दौंड यांनी यावेळी केले.
सोशल डिस्टंन्सिंगचे नियम तसेच शासनाने ठरवून दिलेल्या अटी शर्तींच्या अधीन राहून कोकण विभागाअंतर्गत जिल्ह्यांमधील ग्रामपंचायत, कृषि, वन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागांमार्फत विविध ठिकाणी बांधकामाच्या कामांना २२ एप्रिल पासून सुरुवात झाली आहे. यामध्ये रस्ते दुरुस्ती, नवीन रस्त्यांचे बांधकाम, नाले सफाई, नवीन नाल्यांचे बांधकाम, छोटया नद्यांवरील मोऱ्यांची दूरुस्ती व बांधकाम अशा कामांचा समावेश आहे. पुढील परिस्थितीचा आढावा घेऊन या कामांची संख्या वाढविण्यात आली आहेत. मनरेगा (महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी अधिनियम) या योजनेअंतर्गत विविध विभागांमार्फत उपलब्ध करुन दिलेल्या वाढत्या कामांमुळे लॉकडाऊनच्या काळात बिघडलेले मजुरांचे आर्थिक गणित सुरळीत होण्यास मोठी मदत होत आहे.