<
• सुरु असलेल्या कामांवर 4 हजार 19 मजुर उपस्थित
• सेक्युयर प्रणालीवर 2 हजार 405 कामांना देण्यात आली तांत्रिक व प्रशासकिय मंजुरी
जळगाव, (जिमाका वृत्तसेवा) दि. 24 – कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील अकुशल मजुरांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा. जिल्ह्यातील नागरीकांची उपासमार होवू नये, त्यांच्या हाताला काम मिळावे, याकरीता जिल्हाधिकारी तथा जिल्हा कार्यक्रम अधिकारी जळगांव डॉ अविनाश ढाकणे यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत जास्तीत जास्त कामे सुरु करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याचबरोबर 1 एप्रिल, 2020 पासून अकुशल मजुरीचा दर 238 रुपये इतका करण्यात आला.
लॉकडाऊनच्या काळात स्थानिक मजूरांना गावातच काम उपलब्ध व्हावे याकरीता जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. जळगांव जिल्हयात आज रोजी 711 कामे सुरु असून 4019 मजुर उपस्थित आहेत. तसेच सेक्युयर प्रणालीवर 2405 कामांना तांत्रिक व प्रशासकिय मंजुरी देण्यात आली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर सदर कामांपैकी जास्तीत जास्त कामे सुरु करुन ग्रामीण मजुरांना अधिकाधिक कामे उपलब्ध करुन देण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ ढाकणे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिल्या आहेत. ग्रामीण भागातील मजुरांनी या कामांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
त्याचबरोबरकोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही कामे करतांना मजुरांनी मास्कचा वापर करावा तसेच सामाजिक अंतर ठेवण्याची खबरदारी घेण्यात यावी. तसेच रोजगार हमी योजनेच्या कामांवरील मजुरांना वारंवार हात धुण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून डेटॉल साबणाचे वितरण करण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रसाद मते यांनी दिली आहे.