<
पुणे: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात देशातील १७ आयकॉनिक साइट्सचा वैश्विक डेस्टिनेशन म्हणून विकास करण्याची घोषणा केली आहे. त्यात अजिंठा आणि वेरूळ लेण्यांचाही समावेश असून या दोन्ही लेण्यांचा वर्ल्ड क्लास साइट म्हणून विकास करण्यात येणार आहे. या लेण्यांच्या विकासाचा मास्टर प्लानही तयार करण्यात येत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
अजिंठा-वेरूळ लेण्या या महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन केंद्र आहेत. या ठिकाणी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे प्रशासनाला मोठा महसूलही मिळतो. त्यामुळेच वैश्विक पर्यटन स्थळ म्हणून या दोन्ही लेण्यांचा विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार मिळून हा विकास करणार आहे. अजिंठा-वेरूळसह १७ पर्यटन स्थळांचा वर्ल्ड टुरिजम म्हणून विकास करण्याची योजना आखण्यात आल्याचं पर्यटन मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
मास्टर प्लानच्या कामाला खासगी संस्था
एका खासगी संस्थेमार्फत अजिंठा-वेरूळ लेण्याच्या मास्टर प्लानचं काम सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी रस्ते आणि परिवहन विभाग, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्रालयही कामाला लागले आहे. या १७ ही पर्यटन स्थळांचा विकास करताना संबंधित राज्यांशी सल्लामसलत करण्यात येत असल्याचंही या अधिकाऱ्याने सांगितले.