<
पाचोरा – (प्रमोद सोनवणे) – जगात व देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्गाची लागण दिवसें दिवस वाढत असल्याने आहे त्या उपाययोजना तोकड्या ठरत असल्याचे स्पष्ट होत असून रुग्ण संख्या व मरणाऱ्यांचे प्रमाण कमी व्हायला तयार नाही पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघात अजून एकही रुग्ण अथवा संशयित नसला तरी कोरोना संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी व कोरोना संकटाशी दोन हात करण्यासाठी अधिकाऱ्यांनी संघटितपणे प्रयत्न करून मतदारसंघाला कोरोना पासून दूर ठेवावे अशा आदेशवजा सुचना आमदार किशोर पाटील यांनी शनिवार ता 25 रोजी सकाळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलीस, महसूल , पालिका व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून दिल्या. आमदार किशोर पाटील यांनी आपल्या निवासस्थानाहून पाचोरा व भडगाव तालुक्यातील महसूल, पोलीस ,नगरपालिका व आरोग्य विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करून कामकाजासंदर्भात विविधांगी आदेशही दिले.
पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू असलेल्या गावठी दारूच्या विक्री संदर्भात आमदारांनी नाराजी व्यक्त करून त्यात विशेष लक्ष घालण्याचे उपअधीक्षक कातकडे यांना आदेशित केले .आमदार किशोर पाटील, प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकडे, तहसीलदार कैलास चावडे (पाचोरा)माधुरी आंधळे (भडगाव) मुख्याधिकारी शोभा बाविस्कर (पाचोराग) विकास नवाले (भडगाव) पुरवठा अधिकारी पुनम थोरात (पाचोरा) तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ समाधान वाघ (पाचोरा )जाधव (भडगाव) पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विलास सनेर (पाचोरा) श्री जाधव (भडगाव) यांचेसह सकाळचे बातमीदार प्रा सी एन चौधरी (पाचोरा) व सुधाकर पाटील (भडगाव )यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये सहभाग नोंदवला. आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यात कोराेना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेली नाकेबंदी व उपायोजना संदर्भात अधिकार्यांकडून माहिती जाणून घेतली व कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कशा पद्धतीने प्रभावी अंमलबजावणी करावी १़ यासंदर्भात महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या .स्वस्त धान्य दुकानावर वाटप करण्यात येत असलेले विविध योजनेच्या लाभार्थ्यांचे धान्य, कोरोना निर्मूलनार्थ पाचोरा व भडगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना 50 लाख रुपयांच्या साहित्याचा पुरवठा ,शहरात येणाऱ्या रस्त्यांची नाकेबंदी यासंदर्भात माहिती घेतली. भाजी व फळ विक्रेत्यांना मोकळ्या जागेमध्ये सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळून बसवावे. सोशल डिस्टनसिंग न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असे सूचित केले. तसेच रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन दुचाकीवरून मतदार संघात येणाऱ्या इतर जिल्ह्यातील लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलीस, महसूल व नगरपालिका या तीनही विभागाच्या कर्मचाऱ्यांचे एक संयुक्त पथक नियुक्त करून त्यांना दंड वसुलीचे अधिकार देण्याचे ठरले. कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे तसेच पिंपळगाव हरेश्वर परिसरात व पाचोरा जवळच्या गिरड परिसरात गावठी दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याबाबत आमदारांनी नाराजी व्यक्त करून उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांना हा प्रकार गांभीर्याने घेऊन कारवाई करण्याचे आदेशित केले .तसेच पाचोरा व भडगाव शहरासह ग्रामीण भाग एक दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रत्येकाने कोरोना संसर्ग टाळण्यासाठी काळजी घ्यावी. घाबरू नये पण सजग रहावे. शासनाच्या आदेशाचे व अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे. आपण ,आपले कुटुंब व आपले गाव कोरोना सारख्या जिवघेण्या आजारापासून दूर ठेवावे असे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे केले आहे. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी पाचोरा व भडगाव तालुक्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनार्थ करण्यात येत असलेल्या कामकाजासंदर्भात तसेच शासनाच्या भूमिके संदर्भात माहिती दिली. रेशनिंग संदर्भात होत असलेल्या तक्रारींचा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निपटारा करून लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचविण्यासाठी यंत्रणा प्रयत्न करेल असे तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितले. पाचोरा तालुक्यातील गावठी दारू विक्री संदर्भात कठोर कारवाई सुरू असून ज्या ठिकाणी या संदर्भातील तक्रारी आहेत तेथे विशेष धाडपथक तयार करून कारवाई करण्यात येईल असे उपअधीक्षक ईश्वर कातकडे यांनी आश्वासित केले. कोरोना संदर्भात दिरंगाई व कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडावी व हे कोरोनाशी सुरू असलेले युद्ध जिंकण्यासाठी मदत व सहकार्य करावे अशी अपेक्षा आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केली.