जळगाव -(प्रतिनिधी)-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जळगाव विभागांतर्गत आयोजित आंतरमहाविद्यालयीन नेटबॉल स्पर्धेत मुलींच्या गटात डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले, तर मुलांच्या गटात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने बाजी मारली. ही स्पर्धा शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय, जळगाव येथे उत्साहात पार पडली.

या स्पर्धेत मुलांच्या गटातील चार आणि मुलींच्या गटातील चार अशा एकूण आठ संघांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन विद्यापीठाच्या सिनेट सदस्य सौ. स्वप्नाली काळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे उपस्थित होते.

मुलांच्या गटातील अंतिम सामना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि एम. जी. कॉलेज यांच्यात झाला. या अटीतटीच्या सामन्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने विजय मिळवून विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटातील अंतिम सामन्यात यजमान डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयावर मात करत विजेतेपद मिळविले.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी निवड समिती सदस्य प्रा. अमर हटकर, डॉ. नीलिमा पाटील, प्रा. इफ्तिकार सय्यद, प्रा. हिमाली बोरोले आणि श्री. तागड यांनी सहकार्य केले. तसेच राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू श्री. जैन यांची उपस्थिती लाभली. स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉ. अनिता कोल्हे यांनी केले.

विजयी संघांचे अभिनंदन करत प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे यांनी खेळाडूंना पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाभावना, संघभावना आणि स्पर्धात्मक वृत्तीला प्रोत्साहन मिळाले.








