जळगांव- मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन एकाने विवाहित महिलेसोबत जवळीक साधत तिच्या मर्जीविरुध्द वेळोवेळी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना जळगावमध्ये उघडकीस आली.याबाबत पीडित महिलेच्या तक्रारीवरून एका विरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील एका भागात विवाहिता तिच्या कुटुंबियासह वास्तव्यास आहे. विनोद रामदास तायडे याने विवाहितेला तिच्या मुलाला नोकरी लावून देतो असे सांगितले, या बदल्यात विनोद तायडे याने विवाहितेकडून अडीच लाख रुपये तसेच १५ ग्रॅमचे सोन्याचे दागिणे सुध्दा घेतले.याचदरम्यान विवाहितेसोबत विनोद तायडे याने जवळीक साधत तिच्या मर्जीविरुध्द वेळोवेळी शारिरीक संबंध प्रस्थापित केले.

हा प्रकार जर कुणाला सांगितला तर मुलाला नोकरी लावून देणार नाही, अशी धमकीही विनोद तायडे याने विवाहितेला दिली.१ मे २०२२ ते १ मे २०२३ दरम्यान हा सर्व प्रकार घडला. अखेर या त्रासाला कंटाळून तब्बल एक वर्षानंतर विवाहितेने मंगळवार, २ मे २०२३ रोजी जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरुन विनोद रामदास तायडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गोपाल देशमुख हे करीत आहेत.










