मानवतेचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारे वाल्मीक ऋषी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मंत्रालयात वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी

मुंबई/जळगाव – (प्रतिनिधी) – वाल्मीकी ऋषी हे समाजातील परिवर्तनाचे प्रतीक होते. त्यांनी रामायणाद्वारे मानवाला आदर्श जीवनाचे तत्त्वज्ञान दिले. त्यांनी दाखवून दिले की, प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मबोध आणि परिवर्तनाची शक्ती दडलेली आहे. त्यांच्या जीवनातून समाजाने समतेचा, न्यायाचा आणि सत्याच्या मार्गाचा स्वीकार करावा, हा त्यांच्या शिकवणीचा खरा अर्थ आहे. वाल्मीकी ऋषींचे जीवन हे ‘अंधारातून प्रकाशाकडे’ जाण्याचा प्रवास आहे. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकाला आत्मविश्वास आणि नीतिमूल्यांचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचा आजच्या पिढीला अनुसरून मार्गदर्शन मिळते.” असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

मंत्रालयातील पाणीपुरवठा व स्वच्छता विभागात आज वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी वाल्मीक ऋषींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाला मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.











