जळगाव-(प्रतिनिधी) – जळगाव तालुक्यातील लोणवाडी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीतील ‘प्रोसिडिंग बुक’ मध्ये (कार्यवाही दस्तऐवज) छेडछाड केल्याच्या आणि घरकुल यादीतून पात्र लाभार्थ्यांचे नाव दस्तऐवजात फेरफार करून अपात्र केल्याच्या गंभीर तक्रारीची दखल घेत वरिष्ठ प्रशासकीय कार्यालयांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, जळगाव यांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. अर्जदारांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलीस विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA), जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद (ZP) जळगाव या चार प्रमुख कार्यालयांनी संबंधित कागदपत्रे गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवून ‘नियमोचित’ कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

तक्रार अर्ज आणि संबंधित व्यक्ती
ॲड. अरुण शिवाजी चव्हाण आणि कमलाबाई शिवाजी चव्हाण(बेलदार) (दोघेही रा. लोणवाडी बुद्रुक, ता.जि. जळगाव) यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यांनी ग्रामसेवक रघुनाथ चव्हाण, सरपंच अनिता बळीराम धाडी आणि सरपंच पती बळीराम तुकाराम धाडी (सर्व ग्रामपंचायत लोणवाडी बुद्रुक) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.
अर्जदारांनी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ‘ड’ यादीमध्ये नाव असूनही घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याचा मुद्दाही उपस्थित केला आहे.

विविध कार्यालयांकडून चौकशीचे निर्देश
तक्रारीच्या अनुषंगाने विविध शासकीय कार्यालयांनी केलेल्या कार्यवाहीचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
१. एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन, जळगाव
ॲड. अरुण चव्हाण यांनी २५/०७/२०२५ रोजी पोलीस अधीक्षकांकडे अर्ज सादर केला होता. एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनने १४/०९/२०२५ रोजी अर्जदारांना सूचनापत्र देऊन कळवले की, सदर अर्जातील मजकूर गटविकास अधिकारी, पंचायत समिती, जळगाव यांच्या अधिकार क्षेत्रातील असल्याने अर्ज पुढील योग्य कार्यवाहीसाठी त्यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
२. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA), जळगाव
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला ॲड. अरुण चव्हाण यांचा तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. या यंत्रणेने ०५/०९/२०२५ रोजी गट विकास अधिकारी, पंचायत समिती, जळगाव यांना पत्र पाठवून तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करून नियमोचित कार्यवाही करावी आणि संबंधितांना कळवून केलेल्या कार्यवाहीची एक प्रत कार्यालयास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
३. जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव (महसूल व वन विभाग)
ॲड अरुण शिवाजी चव्हाण व इतरांनी २७/०७/२०२५ रोजी दिलेल्या अर्जाच्या संदर्भात, जिल्हाधिकारी कार्यालयाने १६/०९/२०२५ रोजी गट विकास अधिकारी यांना मूळ अर्ज आणि कागदपत्रे पाठवली आहेत. ‘प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ‘ड’ यादीमध्ये नाव असूनही घरकुलाचा लाभ मिळाला नसल्याबाबत’ या विषयावर सविस्तर चौकशी करून शासन तरतुदीनुसार नियमोचित कार्यवाही करावी आणि अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा, असे निर्देश तहसिलदार (कुळकायदा) विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.
४. जिल्हा परिषद, जळगाव (ग्रामपंचायत विभाग)
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने २३/०९/२०२५ रोजी गट विकास अधिकारी, पंचायत समिती, जळगाव यांना पत्र पाठवले आहे. त्यांनी प्रस्तूत प्रकरणी आपल्या स्तरावरून नियमोचित कार्यवाही करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह आणि पुरावेनिशी आवश्यक कागदपत्रांसह चौकशी अहवाल उलट टपाली दोन प्रतीत सादर करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच, चौकशी अहवाल सादर करण्यास विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यासही सांगितले आहे.
पुढील कार्यवाही
सदर चारही महत्त्वाच्या कार्यालयांनी तक्रारीची गंभीर दखल घेतल्याने, आता या प्रकरणाची सविस्तर चौकशी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, जळगाव यांच्यामार्फत केली जाईल. चौकशीनंतर अहवालात काय निष्कर्ष निघतात आणि संबंधितांवर काय कायदेशीर कारवाई केली जाते, याकडे लोणवाडी बुद्रुक ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.











