लोहारा ता. पाचोरा जि. जळगाव – (रिपोर्टर ईश्वर खरे)-कुऱ्हाड येथे गुरुवारी रात्री सात ते नऊ दरम्यान कुऱ्हाड ते कळमसरा रस्त्यावरील गोलबर्डी शिवारात रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनधारकांना तब्बल एक नव्हे तर तीन बिबटे आढळून आलेत. या परिसरात काल रात्री जणू बिबट्यांचा पोळा भरल्याचे चित्र दिसून येत होते.

कुऱ्हाड व कळमसरा येथील ग्रामस्थांना गोलटेकडी परिसरात तीन बिबटे असल्याची माहिती होताच शेतकऱ्यांनी हातात काठी व टॉर्च घेऊन एकच गर्दी केली होती.सदर या परिसरात एक मोठा व दोन लहान बिबटे येथे बाजूला असलेल्या कळमसरा येथील शेतकऱ्याच्या आखाड्या वर रात्रीच्या वेळेस बांधण्यात आलेल्या शेळ्यांच्या कळपावर शिकार करण्याच्या उद्देशाने आले असल्याची माहिती शेतकऱ्यांना समजली , रात्री सात ते नऊ पर्यंत ग्रामस्थांनी त्यांना हुसकावून लावले.
या प्रकरणी सत्यमेव जयते न्यूज मीडिया प्रतिनिधीने पाचोरा येथील वन विभागाशी संपर्क साधला असता येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी फोन उचलण्यास असमर्थता दर्शवली.
जर रात्रीच्या वेळेस तरुणांच्या अतिउत्साही पणाने एखादी गंभीर स्वरूपाची घटना घडली असती तर कोण जबाबदार राहिले असते.अशी संतप्त चर्चा घटनास्थळी ऐकण्यास मिळत होती.
या परिसरात बाजूला लागून असलेल्या मालखेडा वनपरिक्षेत्र जंगलात बिबट्यांचा नेहमीच वावर असून आतापर्यंत या परिसरात अनेक पशुधनाची हानी झाली आहे. तसेच सद्या शेती हंगामाचे दिवस असून अशा घटनांमुळे शेतकरी शेतात जाण्यास धजावत नाही.
तरी वनविभागाने या संदर्भात तातडीने पावले उचलून उपाययोजना करण्याची मागणी या परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.











