जळगाव-(प्रतिनिधी) – जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या कामाच्या हस्तांतरण करारनाम्यासाठी ८० हजार रुपयांची लाच घेताना एरंडोल तालुक्यातील रिंगणगावचे सरपंच आणि दोन खासगी इसम अशा तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB), जळगाव येथे रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई दिनांक ०७.१०.२०२५ रोजी करण्यात आली.

नेमकं प्रकरण काय?

तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे सुमारे १ कोटी ५० लाख रुपयांचे काम पूर्ण केले होते.

या कामाचे उर्वरित अंदाजे २३ लाख रुपये मिळवण्यासाठी तक्रारदारांचे प्रकरण जिल्हा परिषद, जळगाव येथे सादर होते.मात्र, काम पूर्ण होऊनही ग्रामपंचायत सरपंच यांचा हस्तांतरण करारनामा (Handover Agreement) अपूर्ण असल्याने अंतिम देयक (Final Bill) प्रलंबित होते.

यासाठी तक्रारदारांनी सरपंच भानुदास पुंडलिक मते यांना भेटून करारनामा करून देण्याची विनंती केली.तेव्हा सरपंच भानुदास मते (वय ४४) आणि ग्रामपंचायत सदस्याचे पती समाधान काशिनाथ महाजन (वय ३८) यांनी हस्तांतरण करारनामा करून देण्यासाठी तक्रारदाराकडे सुरुवातीला १,००,०००/- रुपये लाचेची मागणी केली होती व तडजोडीअंती लाचेची रक्कम ८०,०००/- रुपये ठरली.

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक ०६/१०/२०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), जळगाव येथे लेखी तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या पडताळणीमध्ये समाधान महाजन आणि सरपंच भानुदास मते यांनी तक्रारदाराकडे ८०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, दिनांक ०७/१०/२०२५ रोजी जळगाव येथील काव्यरत्नावली चौकात ACB पथकाने सापळा रचला. सापळा कारवाईदरम्यान सरपंच भानुदास मते आणि समाधान महाजन यांनी तक्रारदाराकडून ८०,०००/- रुपयांची लाचेची रक्कम खाजगी इसम संतोष नथ्थु पाटील (वय ४९) याच्यामार्फत पंचासमक्ष स्वीकारली. लाचेची रक्कम स्वीकारताच ACB पथकाने तिन्ही आरोपींना रंगेहाथ अटक केली.

या प्रकरणात गुन्हा दाखल

याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशन, जळगाव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७, ७(अ) व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सापळा पथक – सदरची कारवाई ला.प्र.वि. जळगावचे पोलीस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती स्मिता नवघरे यांनी केली. त्यांना पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, पोना/बाळू मराठे, पोकों/अमोल सुर्यवंशी यांनी सहकार्य केले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन

इ बभ्रष्टाचारासंबंधी कोणतीही माहिती असल्यास किंवा लोकसेवक लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्याशी संपर्क साधावा.

महत्त्वाचे संपर्क क्रमांक:

टोल फ्री क्रमांक (Toll Free Number): १०६४

दूरध्वनी क्रमांक: ०२५७-२२३५४७७

WhatsApp क्रमांक: ९९३०९९७७००

कार्यालयाचा पत्ता: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव

ई-मेल (Email): [email protected] किंवा [email protected]











