जळगाव-(प्रतिनिधी)- केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य परशुराम विठोबा पाटील प्राथमिक विद्यामंदिर तसेच ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय या दोघेही शाळांची परिवहन समितीची सभा नुकतीच संपन्न झाली.
सदर सभेमध्ये रिक्षा तसेच व्हॅन चालकांना परिवहन समिती अध्यक्ष योगेश भालेराव तसेच मुख्या.प्रणिता झांबरे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यात वाहनाचा परवाना ,इन्शुरन्स , पीयूसी असे कागदपत्रे वाहन चालकाकडे असणे अनिवार्य आहे. गाड्यांना जाळ्या असाव्यात. गाड्यांना पिवळा रंग देऊन त्यावरती स्कूल व्हॅन लिहिलेले असावे.
प्रत्येक गाडीमध्ये अग्निशमन यंत्रणा असावी. गाडीमध्ये दर्शनी भागात चाइल्ड हेल्पलाइन नंबर मोठ्या अक्षरात लिहिलेला असावा. रस्त्याने ये जा करताना विद्यार्थी बाहेर डोकावून पाहणार नाही याची काळजी घ्यावी. रिक्षा चालकाचे वर्तन चांगले असावे. वाहन सुस्थितीत असावे. आपल्या वाहनांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या नियमबाह्य नसावी. विद्यार्थ्यांना वेळेवर आणावे व वेळेवर घेऊन जावे. अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री फालक , उपशिक्षक डी.बी.चौधरी , बिपिन झोपे , रिक्षाचालक युनियन अध्यक्ष रतीलाल शिवदे आदी उपस्थित होते











