शिक्षण, समाजकारण आणि लोकसेवेच्या कार्याला कृतज्ञ अभिवादन; नागरिकांना उपस्थितीचे आवाहन
जळगाव -(प्रतिनिधी)-महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविणारे राज्याचे माजी शिक्षणमंत्री, लोकनेते व लोकसेवक बाळासाहेब तथा मधुकरराव चौधरी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण बुधवार, 8 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधनी, शंकरराव नगर, कालिंका माता मंदिराजवळ, जळगाव येथे होणार आहे. हा सोहळा शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाला अभिवादन करणारा ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.

‘व्यक्ती काळाच्या पडद्याआड जाते; मात्र तिचे विचार आणि कार्य समाजाला कायम प्रेरणा देत राहतात,’ या भावनेतून या पुतळा अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षण, समाजकारण आणि लोकसेवेचे आदर्श कार्य करणाऱ्या बाळासाहेब चौधरी यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

‘शिक्षण हेच समाजपरिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे‘ या विचारावर विश्वास ठेवून बाळासाहेब चौधरी यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी आयुष्यभर अथक परिश्रम घेतले. त्यांनी अनेक शाळा व महाविद्यालयांच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले. शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रभावी भूमिका बजावत शिक्षण व्यवस्थेला नवी दिशा दिली.

राज्याचे शिक्षणमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी अनेक दूरदर्शी निर्णय घेतले. विशेष म्हणजे, शिक्षण विषयक श्वेतपत्रिका प्रकाशित करणारे देशातील एकमेव शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी इतिहासात मानाचे स्थान मिळविले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली, तर शिक्षण व्यवस्थेची गुणवत्ता उंचावण्यासही मोठी मदत झाली.

आयोजकांच्या मते, हा पुतळा अनावरण सोहळा केवळ एका महान व्यक्तिमत्त्वाच्या स्मृतींना अभिवादन करणारा कार्यक्रम नसून, भावी पिढ्यांसाठी प्रेरणेचा दीप प्रज्वलित करणारा ऐतिहासिक सोहळा आहे.

या कार्यक्रमास नागरिकांनी सहकुटुंब, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.







