<
जल सरंक्षण अभियानांतर्गत उपक्रम
जळगाव – सध्या सर्वत्र चांगला पाऊस होत असला तरी पाणी वाहुन जाण्याचे प्रमाण अधिक आहे. पावसाचे पडणारे पाणी साठवून ठेवले जात नाही. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईच्या समस्येला सामारे जावे लागते. तेव्हा आतापासुनच पावसाचे पाणी साठवले तर भविष्यात पाणी उपलब्ध राहील असा संकल्प पाणी बचतीची शपथ घेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुलच्या (सेकंडरी) विद्यार्थ्यांनी सोडला.
भवरलाल एण्ड कांताबाई जैन फाउंडेशन आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जलसंरक्षण अभियाना’ निमित्त अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुलच्या (सेकंडरी) येथे पोस्टर्स प्रदर्शन भरविण्यात आले. यावेळी स्कुलच्या प्राचार्या रश्मी लाहोटी, समन्वयिका कविता सोनवणे यांच्यासह जैन इरिगेशनचे दिनेश दीक्षित, आनंद पाटील यांच्या उपस्थितीतभवरलालजी जैन यांच्या पुतळ्यासमोरील रोपट्यांना पाणी देऊन उदघाटन करण्यात आले.
यावेळी दिनेश दीक्षित यांनी प्रदर्शनाच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. आनंद पाटील यांनी पाणी वाचवण्याचे उपाय, दैनंदिन वापरात होणारा पाण्याचा अपव्यय याबाबत उदाहरणे देत मार्गदर्शन केले. दिनेश दीक्षित यांनी मुलांना पाणी बचतीची शपथ दिली. शिक्षिका नेहा सिंघल यांनी आभार मानले. अनुभूती स्कुलचे मनोज दाडकर यांच्यासह शिक्षक-शिक्षिकांची यावेळी उपस्थिती होती.