<
जळगांव(चेतन निंबोळकर)- कोरोना विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाउन आहे. अशा स्थितीत केवळ जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता इतर सर्व व्यवहार ठप्प आहेत. यात वाईन शॉप, बार सर्व बंद असताना देखील दिवसभर दारू सर्वत्र मुबलक स्वरूपात उपलब्ध होत आहे. सर्व वाईन शॉप, बियर बार बंद असताना एवढ्या मुबलक प्रमाणात दारु येते कुठून? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.
याबाबत सविस्तर असे की, कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वोतपरी प्रयत्न करत आहे. तसेच पोलीस कर्मचारी रस्त्यावर कर्तव्य बजावत आहे. याचाच फायदा गल्ली बोळात अवैध दारू विक्रेते घेत असून या अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. भाजीपाला मिळणे कठीण परंतु दारू मात्र सहज उपलब्ध अशी स्थिती आहे. कालच जळगांव तालुका पोलिसांनी मोठया प्रमाणात अवैध दारु जप्त केली असून या लॉकडाउन काळात शहरातील किरकोळ अवैध दारु विक्रेत्यांकडे दारु आली कुठून? असा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. तर लॉकडाउनचा फायदा घेत चढ्या दराने देशी, विदेशी दारू, बिअर, व गावठी दारू विक्री सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहे. अवैध दारू विक्रीतून कोरोना विषाणू प्रसाराचा संभाव्य धोका लक्षात घेणे गरजेचे आहे. तर जळगांव शहरातील सर्व वाईन शॉप व बियर बार यांचा लॉकडाऊन काळातील मद्य साठे राज्य उत्पादन विभागाने तपासल्यास नक्कीच याकाळातले दोषी आढळून येतील. राज्य उत्पादन विभागाकडून अशी कडक तपासणी करण्यात यावी, अशी जनमानसात चर्चा आहे.