<
जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाकडून आवाहन
जळगाव, दि.२८ – शहरात कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला असून त्याचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे आवश्यक आहे. मनपा आयुक्त यांनी देखील तसे निर्देश दिले असून जिल्ह्यातील सर्व व्यापाऱ्यांनी सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे, तोंडाला मास्क लावावा आणि योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा व सचिव ललीत बरडीया यांनी केले आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत असून बाजारपेठेतील गर्दी कमी होत नाही. प्रशासनाकडून उपाययोजना राबविण्यात येत असून व्यापारी, किराणा दुकानदार यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी अन्यथा कारवाई करण्यात येईल असे पत्र मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाला पाठविले आहे.
जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे अध्यक्ष विजय काबरा व सचिव ललीत बरडीया यांनी आवाहन केले आहे की, सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने उघडी ठेवतांना प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे. सोशल डिस्टनसिंग ठेवण्यासाठी बॉक्सची आखणी करावी, चेहऱ्याला मास्क, रुमाल लावावे, हात धुण्यासाठी पाणी, सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी असे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून दिलेल्या सूचनांचे पालन न केल्यास पहिल्या वेळेस दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून दुसऱ्यांदा फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचे देखील त्यांनी कळविले आहे.