विरोदा(किरण पाटील)- आपल्याला माहितच आहे की, मागील काही दिवसापासून आपण कोरोणा या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनचे पालन करत आहोत. आपण सर्वांनी जागरूक राहून लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन केल्यानेच आपल्या दोन्ही तालुक्यांमध्ये आज पर्यंत एकही कोरोना बाधित रूग्ण आढळला नाही. आपण सर्वांनी धैर्याने प्रशासनाला साथ दिल्यामुळेच आपण पुढे मार्गक्रमण करीत आहोत. लॉकडाऊन हे मुख्यतः आपल्या सर्वांच्या सुरक्षितेसाठी आहे याचा मुख्य उद्देश हा कोरोनची साखळी तोडणे हा आहे.
त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंचे पालन करणे, सतत हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. मागील एक महिन्यापासून आपण त्याचे तंतोतंत पालन करत आहोत. या कालावधीमध्ये आपण मास्क न वापरणारे आणि आणि विनाकारण गाडीवर फिरणारे यांच्याकडून एक लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल केलेला आहे. भविष्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यास सामोरे जाण्यासाठी आपण कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून फैजपुर उपविभागात १००० रुग्णांसाठी आवश्यक सुविधांसह सेंटर उभे केले आहेत. प्रत्येक गावात आणि शहरांमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांकरिता विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आलेले आहेत. या कक्षांमध्ये आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त नागरिक राहत आहेत. सर्व डॉक्टर, पोलीस, शिक्षक, आरोग्य सेविका, अशावर्कर, प्रशासकीययंत्रणा चांगल्याप्रकारे काम करत आहेतच. विशेष उल्लेख करावा असे म्हणजे सर्व गावातील ग्रामस्तरीय समित्या आणि सर्व वैद्यकीय केंद्रात सेवा देणारे डॉक्टर आणि सहयोगी यंत्रणा कोरोणापासून आपला बचाव व्हावा. यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. आपण पाच ठिकाणी निश्चित करून त्याठिकाणी नाकाबंदीही केली आहे. शासनाने आता बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये अडकलेल्या कामगार, नागरिक यांना स्वतःच्या गावांमध्ये येण्यासाठी सशर्त नोडल अधिकारी यांची परवानगी घेऊन प्रवेश देण्याचे निश्चित केलेले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक आपल्या गावात येऊ शकतात. त्यामुळे मी आपणास विनंती करतो की, जे नागरिक येतील त्यांना आपल्याला १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवायचा आहे. त्यासाठी आपण २४ एप्रिलला परिपत्रक काढलेले आहे. त्यानुसार आपल्या घरांमध्ये किंवा आपल्या भागांमध्ये किंवा आपल्या गावांमध्ये किंवा आपल्या शहरांमध्ये या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर आपल्याला बाहेरून आलेल्या व्यक्तीला १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवावे लागणार आहे. याचे तंतोतंत पालन व्हायला हवे, त्याचे पालन न करणाऱ्यावर आपण गुन्हे दाखल करण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे मी नागरिकांना विनंती करतो जर एखादी व्यक्ती बाहेर व्यवस्थित राहत असेल तर त्याला आपल्याकडे विनाकारण आणण्याचा प्रयत्न करू नका. आपल्याला माहितच आहे की, आपल्या नजिकच्या भुसावळ, अमळनेर, जळगाव, पाचोरा, चोपडा या तालुक्यांमध्ये रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आपल्याला सतर्क राहायला हवे. त्यामध्ये आपल्याला सर्वाधिक जास्त काळजी घ्यायची आहे ती आपल्या घरांमधील ज्येष्ठ व्यक्ती आणि विविध आजाराने ग्रस्त व्यक्तीची. कारण या व्यक्तींना या विषाणूची लागण झाल्यानंतर सर्वात जास्त धोका आहे, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेतली जावी. त्याचबरोबर जे तरुण विनाकारण बाहेर फिरतात त्यांना वाटतं की मला काहीच होणार नाही. परंतु त्यांना हे समजत नाही की, आपल्यामुळे या विषाणूचा संसर्ग घरामध्ये होऊ शकतो. घरातील सर्वांचे जीव धोक्यात घालतोय याची जाणीव मात्र त्यांना नाही. त्यामुळे माझ्या तरुण मित्रांना विनंती आहे की, विनाकारण बाहेर फिरू नये. आपणाला माहितच आहे की, अमळनेरमध्ये तरुण मुलामुळे घरामधील सर्वांना विषाणूची लागण झाली. तेव्हा माझी यावल व रावेर तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की, आपण आपली स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला घाबरू नका, पण जागरूक रहा आणि प्रशासनाला सहकार्य करा. असे आवाहन डाँ अजित थोरबोले इन्सिडेंट कमांडर तथा उपविभागीय दंडाधिकारी, फैजपूर यांनी यावेळी नागरिकांना केले.