<
कळंब, तालुका प्रतिनिधी ( हर्षवर्धन मडके)
सोलापूर पोलिस दलातील बार्शी तालुक्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी (दि. 1) समोर आले. याला तत्पूर्वी तीन ते चार दिवसांपासून कोरोनाची लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली होती. यामुळे त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याच्या अहवालात कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याचे मुळ गाव असलेल्या चिखलीतही खळबळ उडाली. कारण कोरोनाची लक्षणे सुरू होण्याच्या अगोदरच 24 व 25 एप्रिललाच चिखली येथे मुळ गावी येऊन गेल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे तात्काळ चिखली गाव सील केलेले आहे. त्यानंतर पोलिसांच्या कुटुंबातील आई , वडील , भाऊ , भावजय यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. आज चार पैकी तीन व्यक्तींच्या अहवाल निगेटिव्ह आलेला आहे आणि आणखी एक रिपोर्ट पेंडिंग आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.