<
जळगांव(प्रतिनिधी)- विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांच्या परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना प्रदान केल्यानंतर राज्य समितीने मुंबई विद्यापीठांच्या कुलगुरूमार्फत विद्यार्थी संघटनांकडून त्यांची मते व सूचना मागविण्याचे आवाहन केले होते त्याद्वारे आम्ही महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनकडून (मासु) दिनांक २ मे रोजी कोरोना विषाणूंच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यासाठी विद्यापीठांच्या सेमिस्टर/ शेवटच्या वर्षाच्या परीक्षांचे निराकरण करण्याबाबत राज्य समितीला मुंबई विद्यापीठांच्या कुलगुरुमार्फत प्रस्ताव पाठविलेला असून तो कुलगुरूंना प्राप्त झाला व राज्य समितीच्या बैठकीत आमच्या प्रस्तावावर विचार केला जाईल असे आम्हाला सूचित करण्यात आले.
त्याअगोदर त्यांनी २३ एप्रिल रोजी विद्यापीठ अनुदान आयोगाला (युजीसी) सुद्धा परीक्षेसंबंधी प्रस्ताव सादर केला होता, विद्यापीठाच्या परीक्षांसाठी मार्गदर्शक सूचना तयार करताना युजीसीने आमच्या प्रस्तावाची दखल घेऊन आमच्या प्रस्तावातले काही मुद्द्यांना परीक्षा मार्गदर्शक सूचनामध्ये पॉईंट क्रमांक ५, ६ आणि नियोजित वेळापत्रक शैक्षणिक वर्ष पॉईंट क्रमांक ४ मध्ये समाविष्ट केले आहे. राज्य समितीने अहवाल तयार करताना विद्यापीठांकरिता परीक्षा आणि शैक्षणिक कॅलेंडरवरील यूजीसी मार्गदर्शक सूचना ज्या पुष्ट क्रमांक ५ आणि ६ वर नमूद केलेल्या आहेत त्याचा काटेकोरपणे विचार करावा अशी विनंती आम्ही आमच्या प्रस्ताव निवेदनात केलेली आहे. परीक्षांचे निराकरण करण्याबाबत राज्य समितीला प्रस्ताव निवेदन सादर करतांना आम्ही युजीसी मार्गदर्शक सूचना, केंद्र सरकारच्या गृह मंत्रालय व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दि. १ मे रोजी जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचना तसेच पुढील दोन आठवड्याकरिता वाढविण्यात आलेला लॉकडाउनचा तसेच वर्तमान परिस्थिती आणि भविष्यातील अनिश्चितता यांचा सारासार विचार करूनच प्रस्ताव तयार केलेला आहे. भारत सरकारच्या कुटुंब कल्याण मंत्रालयाने दि. १ मे रोजी जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनानुसार महाराष्ट्र राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी १४ जिल्हे रेड झोन (हॉटस्पॉट) अंतर्गत येतात, १६ जिल्हे ऑरेंज झोन आणि ०६ जिल्हे ग्रीन झोन अंतर्गत येतात म्हणजेच काय तर एकूण ३० जिल्हे कोविड -१९ साथीच्या आजाराने सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. आम्हाला महाराष्ट्रातील ३० लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेतेची आणि त्यांचे भविष्य याची सर्वात जास्त चिंता आहे ,ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यास आमचा आक्षेप आहे सध्याच्या परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारच्या परीक्षा आयोजित करताना विद्यापीठे आणि विद्यार्थ्यांना खूप अडचणींचा सामोरे जावे लागणार आहे याची सविस्तर माहिती आम्ही आमच्या प्रस्तावात पेज क्रमांक ५ आणि ६ “ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यास अडचणी / मर्यादा / निर्बंध” या शीर्षकाखाली नमूद केले आहे. जर परीक्षा घेण्याचा अट्टहास करण्यात येत असेल तर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची व भविष्याची जबाबदारी कुणाची याचा खुलासा राज्य समितीने करावा तसेच या परीक्षेच्या दरम्यान एक विद्यार्थ्याला देखील कोविडचा प्रादुर्भाव झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी हि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि विद्यापीठ प्रशासन यांची असेल असे परखड मत मासुचे संस्थापक अध्यक्ष अँड. सिद्धार्थ इंगळे यांनी व्यक्त केले.
मुख्यतः ज्यांच्यासाठी हा सर्व खटाटोप सुरु आहे अश्याना म्हणजेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना विश्वासात घेणे आम्हाला सर्वात जास्त महत्वाचे वाटले म्हणून विद्यार्थ्यांच्या परीक्षांबद्दलचे मत काय आहे ? तसेच त्यांच्या अडचणी आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी आम्ही फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हद्वारे” ऑनलाईन विद्यार्थी संवाद आयोजित केला होता त्यात २५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी हे लाइव्ह पाहिले आणि ७५ % हून अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्रश्नांची / अडचणींबद्दल सांगताना परीक्षा न घेता प्रमोट करावे असे सांगितले किंवा आमच्या मागील सेमिस्टर / वर्षाच्या आधारे आम्हाला सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करावे. आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची मते जाणून घेण्यासाठी गूगल फॉर्मद्वारे “प्रत्यक्ष सर्वेक्षण करण्याकरिता एक प्रश्नावली देखील तयार केलेली आहे त्यामध्ये सुद्धा ८३% विद्यार्थ्यांनी परीक्षा न घेता आम्हाला मागील सेमिस्टरच्या / वर्षाच्या गुणांच्या आधारे उत्तीर्ण करावे असे सूचित केले आहे म्हणजेच एकंदरीतच काय तर विद्यार्थ्यांच्या मते त्यांना सरासरी गुण देऊन उत्तीर्ण करावे असे जाणवते आणि हेच यूजीसीने सुद्धा त्यांच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद केलेले आहे असे मासुचे राज्य सहसचिव दादाराव नांगरे यांनी निदर्शनास आणले. कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी अधिक खबरदारी घेणे अति आवश्यक असल्याकारणाने अशा परिस्थितीत वार्षिक परीक्षा किंवा सेमिस्टर परीक्षा घेण्याऐवजी विद्यार्थ्यांनी आतापर्यंत उत्तीर्ण केलेल्या सर्व सेमेस्टरच्या गुणांची सरासरी विचारात घ्यावी आणि जेथे सरासरी गुण/ क्रेडिट गुण / ग्रेडच्या आधारे विद्यार्थ्यांना त्यांच्या अगोदरच्या सर्व सत्रांचे गुण एकत्रित करून त्यांची सरासरी करून वार्षिक परीक्षा किंवा पुढच्या सेमिस्टरसाठी गुण प्रदान करण्यात यावेत जे यूजीसी मार्गदर्शक सूचनेला अनुसरून आहेत अशी आग्रहाची मागणी आम्ही प्रस्तावाद्वारे राज्य समितीकडे केली आहे असे उत्तर महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष अरुण कवरसिंग चव्हाण यांनी माहिती दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने पसरत चाललाय आणि अशा परिस्थितीत अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासातून जावे लागत आहे. परीक्षा आयोजनात शिक्षक, विद्यार्थी, परीक्षक आणि इतरांचा मोठ्या सहभाग असतो अशामध्ये कुणाला साधी शिंक तरी आली तरी परिस्थिती गंभीर होऊन भीतीचे भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. कोविड-१९ संसर्गजन्य आजार असल्याने संपर्कात येणाऱ्या व्यक्तीसही लागण होण्याची दाट शक्यता आहे. गेल्या काही दिवसात विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनला परीक्षेच्या संदर्भातील प्रश्नांची विचारणा झाली असता त्यातून असे लक्षात आले की, जवळपास ५०% महाविद्यालयांचे ऑनलाइन पद्धतीने क्लासेस झालेले नाहीत आणि जे ऑनलाईन क्लासेस घेतले गेले त्यातून विद्यार्थ्यांना विषय समजताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागले असे मासुचे जळगाव विभागप्रमुख अँड.अभिजीत जितेंद्र रंधे यांनी सांगितले.