<
रूजू झालेल्या नव्या पथकाचे स्वागत
अमरावती : कोविड रूग्णालयात अहोरात्र सेवा बजावणाऱ्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी या कोरोना लढवय्यांना वाद्यवृंदाच्या तालावर निरोप देण्यात आला. हे पथक आता संस्थात्मक विलगीकरणात राहून काही काळानंतर पुन्हा नव्याने सेवेसाठी सज्ज होणार आहे. दरम्यान, कोविड रूग्णालयात रूजू झालेल्या नव्या पथकाचे स्वागतही करण्यात आले आहे.
कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी येथील सुपरस्पेशालिटी रूग्णालयात कोविड १९ विशेष रुग्णालय तयार करण्यात आले आहे. रुग्णांची देखभाल आणि उपचार करण्यासाठी या रुग्णालयात सुमारे १०० जणांचे पथक दिवसरात्र कार्यरत असते. डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, सफाई कर्मचारी, तंत्रज्ञ, रुग्णवाहिका चालक आदींचा त्यात समावेश आहे. कोविड रूग्णालयात सेवा देण्यासाठी तीन टीम तयार करण्यात आल्या असून, दर १० दिवसांनी त्यांच्या ड्युटी बदलून त्यानंतर त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाते. असा संपूर्ण काळ ही मंडळी आपल्या घरापासून दूर असते.
तिसरी टीम आपली सेवा देऊन रवाना झाली. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी स्वतः उपस्थित राहून या टीमच्या सदस्यांना निरोप दिला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.श्यामसुंदर निकम व इतर आरोग्य अधिकारी हेही यावेळी उपस्थित होते.
यावेळी पोलीस बँड वाजवून या पथकाचा सन्मानदेखील करण्यात आला. वाद्यवृंदाच्या तालावर सर्वांनी टाळ्या वाजवून या कोरोना लढवय्यांचे मनोबल वाढविले. अत्यंत जोखमीतही अहोरात्र आपली सेवा बजावणाऱ्या या कोरोना लढवय्यांवर फुलांचा वर्षावही करण्यात आला. जिल्हाधिकारी श्री.नवाल यांनी यावेळी सर्व कोरोना लढवय्यांशी संवादही साधला.