<
जळगाव, दि.८ – शासनाने मद्य विक्रीची दुकाने खुली करण्याची मुभा दिल्यानंतर सर्वच दुकानांवर गर्दी उसळली होती. नागरिकांकडून सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळले जात नसल्याने नेहरू युवा केंद्राचे समन्वयक सामाजिक कार्यासाठी पुढे सरसावले आहे.
जिल्ह्यातील जवळपास सर्वच वाईन शॉप्सच्या बाहेर तळीरामांनी मद्य खरेदीसाठी गर्दी केल्याचे चित्र दोन दिवसांपासून पहावयास मिळत आहे. मद्यपीकडून सोशल डिस्टनसिंग पाळले जात नसल्याचे नेहरू युवा केंद्र जळगावचे समन्वयक नरेंद्र डागर यांच्या लक्षात आले. डागर यांनी लागलीच याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभाग अधीक्षक नितीन धार्मिक यांच्याशी संपर्क केला व वाईन शॉपबाहेर मदतीसाठी नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे सुचविले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांनी होकार कळविताच गुरुवारी नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक वाईन शॉपबाहेर आपले कर्तव्य पार पाडत होते.
मास्क वापरणे, सोशल डिस्टनसिंग पाळण्याच्या सूचना
नेहरू युवा केंद्राचे युवक प्रतिनिधी चेतन वाणी यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहरातील दोन वाईन शॉपच्या बाहेर मद्य घेण्यासाठी येत असलेल्या नागरिकांना नेहरू युवा केंद्र जळगावचे स्वयंसेवक आकाश धनगर, शाहरुख पिंजारी, रोहित पाटील, रोहन अवचारे, नाना सोनवणे, मयूर सोनवणे यांनी मास्क वापरण्याचे आवाहन केले. तसेच नागरिकांना सोशल डिस्टनसिंगचे पालन करून घरातच राहून काळजी घेण्याचे आवाहन केले.
इच्छूक स्वयंसेवकांना आवाहन
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जे स्वयंसेवक नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून प्रशासनाला मदत करू इच्छिता त्यांनी मानराज पार्कजवळ असलेल्या नेहरू युवा केंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर व लेखापाल अजिंक्य गवळी यांनी केले आहे.