<
जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी 1921 या टोल फ्री क्रमांकावर फिचर फोन व दूरध्वनीवरून मिस कॉल करून नोंदणी करावी- जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे
उस्मानाबाद, दि.9 :- कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत केंद्र शासनाने आरोग्य सेतू या मोबाईल ॲप ची निर्मिती केली आहे. जिल्ह्यातील सर्व स्मार्टफोन धारक यांनी गूगल प्ले स्टोर वरून आरोग्य सेतु ॲप डाऊनलोड करावे तसेच ज्या लोकांकडे स्मार्टफोन नाही अश्या फीचर फोन धारकांनी तसेच दूरध्वनी धारक नागरिकांनी 1921 या टोल फ्री क्रमांकावर मिस कॉल देऊन आरोग्य सेतू आयव्हीआरएस सिस्टीम मध्ये नोंदणी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.
भारतातील सर्व नागरिकांना साध्या मोबाईलने किंवा दूरध्वनी असलेल्या नागरिकांना आरोग्य सेतूशी जोडण्यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू आयव्हीआरएस सेवा सुरू केली आहे. स्मार्टफोन धारकांसाठी ही सेवा पूर्वीपासूनच सुरू आहे. संपूर्ण देशभरात साधा मोबाईल किंवा दूरध्वनी असलेल्या नागरिकांसाठी ही सेवा संपूर्ण देशभरात सुरू करण्यात आलेली आहे.
ही एक टोल – फ्री सेवा असून नागरिकांना 1921 क्रमांकावर एक मिस्ड कॉल द्यावयाचा आहे . आपण 1921 क्रमांकावर कॉल केल्यानंतर हा कॉल डीसकनेक्ट होईल आणि आपल्या फोनवर आरोग्य मंत्रालयाकडून फोन येईल आणि आपल्या आरोग्यासंदर्भात काही सोपे प्रश्न विचारले जातील. त्या प्रश्नांची दिलेल्या उत्तरानुसार आरोग्य सेतू ॲपमधील सेल्फ ॲसेसमेंट ( स्वयं चाचणी ) प्रमाणे संरेखित केले जाईल. दिलेल्या प्रतिसादाच्या आधारे , नागरिकांना त्यांच्या आरोग्यासबंधी स्थिती दर्शविणारा एसएमएस देखील मिळणार आहे. ही सुविधा मराठीसह इतर १० प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकाने दिलेल्या माहितीनुसार त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठीच्या सूचना आणि सतर्कतेचे संदेश नागरिकांना नियमीत पाठविण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी मुधोल-मुंडे यांनी सांगितले.
स्मार्ट मोबाईल फोन धारकांसाठी भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राने विकसीत केलेले आरोग्य सेतू मोबाईल ॲप उपलब्ध करुन दिले आहे. या ॲपद्वारे नोंदणी करून नागरिक स्वयं चाचणी करू शकतात. तसेच या माहितीच्या आधारे नागरिकांना कोरोनाचा धोका आहे की नाही हे लक्षात येण्यास मदत होते . तसेच तुम्ही जर एखाद्या कोरोना विषाणूबाधित रुग्णाच्या जवळून गेल्यास किंवा त्याच्या संपर्कात आल्यास हे ॲप याबाबत सुचित करते. तसेच या ॲपद्वारे 500 मीटर ते दहा किलोमीटरच्या परिसरात कोणी कोरोना बाधित रुग्ण आहे याचे संकेत दिले जातात. त्यामुळे सदरील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास डिटेक्ट करणे सोपे होते. तसेच याच्या माध्यमातून वेळोवेळी आपण सुरक्षित आहोत का याची माहिती दिली जाते. या ॲप मध्ये कोरोना प्रतिबंधासाठी विविध उपाययोजना व माहिती देण्यात आलेली आहे, असे ही मुधोल मुंडे यांनी स्पष्ट केले.
तरी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व स्मार्टफोन धारक, फीचर फोन धारक व दुरध्वनी धारक नागरिकांनी या आरोग्य सेतू सेवेचा लाभ घ्यावा व आपला उस्मानाबाद जिल्हा ग्रीन झोनमध्ये आहे व तो ग्रीन झोन मध्येच राहील यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले.