<
कृषी उत्पन्न बाजार समितीत होणार शेतकऱ्यांची मोबाईलवर नाव नोंदणी
चाळीसगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. लॉकडाऊनमुळे कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात झालेली घसरण व शासनाची हमीभावाने कापूस खरेदी केंद्रे बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर शिल्लक असलेला कापूस हा नाईलाजाने शेतकऱ्यांना कमी भावाने विकावा लागत होता. तसेच कापसात पिसे पडत असल्याने शेतकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. मात्र लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर चाळीसगाव येथील सत्यम कोटेक्स प्रा.लि.भोरस येथे मान्यता मिळालेले सीसीआय – कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती, मात्र खरेदी केंद्रावर मजूर उपलब्ध होत नसल्याने तसेच शासनाच्या नियमाप्रमाणे एप्रिल व मे महिन्यासाठी कापसाच्या दर्जाबाबत असलेल्या अटी – शर्थीमुळे सत्यम कोटेक्स तर्फे कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यास टाळाटाळ केली जात होती. आमदार मंगेश चव्हाण यांना कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणू दिली असता त्यांनी तात्काळ भारतीय कपास निगमचे केंद्र प्रमुख जे पी सिंग यांची बैठक बोलावून माहिती जाणून घेतली तसेच खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत येणाऱ्या अडचणींबाबत मा.महाप्रबंधक सो, भारतीय कपास निगम लि., औरंगाबाद यांना पत्र देऊन सूचना केल्या होत्या.
चाळीसगावच्या खरेदी केंद्राबाबत आमदार मंगेश चव्हाण यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व माजीमंत्री गिरीश महाजन यांनादेखील कळवले असता नामदार पाटील व आमदार महाजन यांनी सीसीआय चे महाप्रबंधक यांच्याशी फोनवर याबाबत चर्चा केली होती. जळगाव येथे कोरोना संदर्भात उपाययोजना बाबत जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांची आमदार चव्हाण यांनी मागील आठवड्यात भेट घेतली तेव्हादेखील त्यांनी जिल्हाधिकारी महोदय यांनी चाळीसगाव येथील कापूस खरेदी केंद्र याबाबत वैयक्तिक लक्ष द्यावे अशी विनंती केली असता त्यांनीदेखील हा महत्वाचा मुद्दा असून याबाबत सीसीआय कडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
अखेर आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून सीसीआयच्यावतीने सत्यम कोटेक्स येथे कापूस खरेदी सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी सोमवार दि.११ मे पासून चाळीसगाव कृषी उत्पन बाजार समिती येथे त्यांनी दिलेल्या 9561369406 या मोबाईल क्रमांकावर फोन करून शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. नाव नोंदणीसाठी कुणीही बाजार समितीत येऊ नये असे आवाहन सभापती सरदारसिंग राजपूत व उपसभापती किशोर पाटील यांनी केले आहे.
खरेदी केंद्राच्या ठिकाणी अत्यावश्यक असणारी कागदपत्रे
१) सन २०१९-२० चा कापूस पिकपेरा असलेला व तलाठी यांचा सहीशिक्का असलेला ७/१२ उतारा
२) शेतकऱ्याच्या बँक पासबुक झेरॉक्स ज्यात IFSC कोड असणे गरजेचे।
३) आधार कार्ड झेरॉक्स
कापूस खरेदीच्या ठिकाणी येताना शेतकऱ्यांनी मास्क किंवा तोंडावर रुमाल वापरणे बंधनकारक असून सोशल डिस्टनसिंग पाळणे गरजेचे आहे.