मुंबई – प्रतिनिधी
मरिन ड्राईव्ह परिसरात 27 वर्षीय तरुणाने 3 पोलिसांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्या प्रकरणी तरूणाला अटक करण्यात आली आहे. सदर तरुण आईसोबत भांडण करून घराबाहेर पडला होता. करण प्रदीप नायर असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. तो बेरोजगार आहे. हा तरूण कंबाला हिल येथील उच्चभ्रू वस्तीतील रहिवासी आहे. मरिन ड्राईव्ह येथील फुटपाथवर नायर शुक्रवारी रात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास चाकू घेऊन फिरत होता. त्यावेळी बोट क्लबजवळ नाकाबंदीत कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनी चाकूधारी तरुणाला पाहिले. त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांवर वार करण्याचा प्रयत्न केला. पोलीस त्याच्या जवळ जाताच तो चाकू फिरवायचा.
भीतीपोटी स्वत:वर अथवा पोलिसांवर तरुण वार करेल, ही शक्यता लक्षात घेऊन पोलीस नायरला पकडण्यासाठी घेराव घालत होते. त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असताना नायरने चाकू फिरवल्याने पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके व पोलीस शिपाई सागर शेळके गंभीर जखमी झाले. अथक प्रयत्न करून अखेर नायरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. दरम्यान जखमी पोलिसांना तात्काळ प्राथमिक जे.जे. रुग्णालयात नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले आहे. या प्रकरणी लो. टी. मार्ग पोलीस ठाण्यात ( गु र क्र २८२/२०) भादंवि कलम ३०७, ३३२, ३२४, ३५३ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ नुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.आईसोबत भांडण करून आरोपी करण नायर हा घराबाहेर पडला होता. आज कोणाला तरी मारणार, असा निश्चय करूनच करण नायर घराबाहेर पडल्याचे चौकशीदरम्यान समोर आले आहे.