<
निधनापूर्वी ४ तास आधी ट्विट करून कलम ३७० बाबत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाबद्दल सुषमा यांनी केलं होतं पंतप्रधान मोदींचं अभिनंदन
नवी दिल्ली – माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचे आकस्मिक निधन झाले आहे. त्या ६७ वर्षांच्या होत्या. सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका कणखर नेतृत्वाला देश मुकला आहे.
सुषमा यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने तातडीने दिल्ली मधील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचे आधीच निधन झाल्याचे स्पष्ट केले. सुषमा यांच्या निधनाचे वृत्त येताच राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह केंद्र सरकारमधील अनेक वरिष्ठ मंत्री तातडीने एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत.
सुषमा स्वराज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय होत्या. जम्मू-काश्मीरला कलम ३७० च्या जोखाडातून मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल व जम्मू-काश्मीरचं विभाजन करणारं विधेयक संसेदत मंजूर करून घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केल्याबद्दल सुषमा यांनी आज सायंकाळी साडेसात वाजता ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. ‘मैं अपने जीवन में इस दिन को देखने की प्रतीक्षा कर रही थी’ अशा भावनाही सुषमा स्वराज यांनी या ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केल्या होत्या. या ट्विटनंतर काही तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली.