मुंबईतून वाहणारी प्रमुख नदी म्हणून ओळखल्या जाणाऱया मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामाची पाहणी महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंग चहल यांनी आज (दिनांक ११ मे २०२०) दुपारी केली. कामाच्या गतीबद्दल समाधान व्यक्त करतानाच पावसाळ्यापूर्वी गाळ काढण्याचे उद्दिष्ट साध्य करावे, त्यासाठी आवश्यकता भासल्यास अतिरिक्त संयंत्रे व मनुष्यबळ तैनात करुन दोन सत्रांमध्ये (शिफ्ट) काम करण्याचे निर्देशही आयुक्तांनी यावेळी दिले.
आयुक्त श्री. चहल यांनी मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामाची प्रारंभी माहिम कॉजवे येथील मिठी नदीचे पातमुख (outfall) येथे पाहणी केली. त्यानंतर वांद्रे-कुर्ला संकुलात अमेरिकन स्कूल मागे आणि बीकेसी पूर्व- पश्चिम जोडणारा उड्डाणपूल (east-west connector) येथेही त्यांनी भेट देऊन कामाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू, उपायुक्त (पायाभूत सुविधा) श्री. संजय दराडे, प्रमुख अभियंता (पर्जन्यजल वाहिन्या) श्री. संजय जाधव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाची ‘कोरोना कोविड १९’ या आजाराशी एकीकडे दिवस-रात्र लढाई सुरू असतानाच दुसरीकडे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील इतर आवश्यक नागरी सेवा-सुविधांची कामे आणि प्रकल्प देखील निर्धारित वेळापत्रकानुसार पूर्ण होतील, याकडे महानगरपालिका प्रशासन कटाक्षाने लक्ष देत आहे. विशेष म्हणजे ‘कोरोना कोविड १९’ या संसर्गजन्य आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या कारणाने पावसाळापूर्व कामे वेळेत पूर्ण होण्यास अनेक आव्हाने व अडचणी असताना देखील महानगरपालिकेच्या स्तरावर सुव्यवस्थित नियोजन करून कामे वेळेतच पूर्ण होतील, याकडे प्राधान्याने लक्ष दिले जात आहे. त्याची प्रत्यक्ष स्थिती पाहण्यासाठी आयुक्त श्री. चहल यांनी आज दुपारी भर उन्हात ही भेट दिली.
यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्री. वेलरासू यांनी माहिती दिली की, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शहर, पूर्व उपनगरे व पश्चिम उपनगरे अशा तिन्ही भागातून सुमारे २१.५०५ किलोमीटर लांबीचा मिठी नदीचा प्रवाह आहे. त्यातून गाळ काढून स्वच्छता करण्याचे काम वेगाने सुरू आहे. कंत्राट कालावधीदरम्यान मिठी नदीमधून सुमारे १ लाख ३८ हजार ८३० मेट्रीक टन एवढा गाळ उपसण्याचे लक्ष्य असते. यापैकी ७० टक्के म्हणजे ९८ हजार ५०० मेट्रीक टन गाळ हा पावसाळापूर्व साफसफाई म्हणून काढला जाणार आहे. या ९८ हजार ५०० मेट्रीक टन पैकी आतापर्यंत २६ हजार ११८ मेट्रीक टन गाळ काढण्यात आला आहे. पावसाळापूर्व उद्दिष्टाच्या २९ टक्के काम पूर्ण झाले असून पावसाळ्यापूर्वी संपूर्ण उद्दिष्ट गाठले जाईल, अशारितीने कामास गती देण्यात आली असल्याचेही श्री. वेलरासू यांनी सांगितले.
आयुक्त श्री. चहल यांनी सर्व माहिती घेतल्यानंतर निर्देश दिले की, पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. लॉकडाऊनच्या अडचणींवर मात करुन आपण कामांना गती दिली आहे, ही समाधानाची बाब आहे. आता आवश्यक असल्यास अधिक संयंत्रे, मनुष्यबळ तैनात करावे. गरज असल्यास दोन सत्रांमध्ये काम पूर्ण करुन गाळ उपसण्याचे उद्दिष्ट नियोजित वेळेत गाठावे, असे ते म्हणाले.